मुंबई-गेल्या काही दिवसांपासूनमहायुतीमधील अंतर्गत वाद आणि कलह आता चव्हाट्यावर येऊ लागलेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात आयाराम-गयारामांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महायुतीमध्येही जागावाटपावरून चढाओढ सुरू असून, नाराज असलेले उमेदवार दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. खरं तर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर जळकोट मतदारसंघावर दावा सांगत भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई गाठलीय. लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार संजय बनसोडे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून मंत्री असलेले संजय बनसोडे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यावर शिक्कामोर्तब झालंय.
उदगीर भाजपाचा बालेकिल्ला:दुसरीकडे लातूर जिल्ह्यातला उदगीर जळकोट मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, त्यामुळे या मतदारसंघावर भाजपाचा हक्क असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलाय, यासाठी भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते विश्वजीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मुंबईकडे रवाना झालेत. मुंबईतील भाजपाच्या मुख्यालयात दाखल होत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले असून, आपली मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे आणि आपला मतदारसंघ परत मिळवणे एवढाच हेतू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट मतदारसंघातून संजय बनसोडे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही किंवा ऐन वेळी ती बदलल्यात बनसोडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.