मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी सचिन वाजेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाजेला जामीन मिळालेला नसल्यानं या प्रकरणात जामीन मिळूनही वाजेला तुरुंगातच राहावं लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी दुपारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला.
सुटकेसाठी घेतली होती न्यायालयात धाव : कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात 2021 पासून अटकेत असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेने सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपली अटक बेकायदेशीर असल्यानं तत्काळ आपली मुक्तता करावी, अशी मागणी करणारी याचिका सचिन वाजेने दाखल केली होती.
देशाच्या ॲटर्नी जनरल यांना नोटीस : वाजेच्या याचिकेवरील सुनावणी निश्चित करण्यासाठी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर आले होते. त्यामध्ये वाजेतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर स्पष्टतेसाठी मुंबई उच्च न्यायालयाने देशाच्या ॲटर्नी जनरल यांना नोटीस बजावली होती. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना जामीन मिळाला असल्यानं आपल्याला जामीन मिळावा, अशी मागणी वाजेने याचिकेद्वारे केली होती.
अद्याप साक्ष दिलेली नाही :या प्रकरणात वाजेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आल्यानं त्याला जामीन द्यावा, अशी मागणी वाजेच्या वकिलांनी केली. वाजेने अद्याप साक्ष दिलेली नसल्यानं त्याला जामीन दिला जावू नये, अशी मागणी सरकारतर्फे करण्यात आली.
'यूएपीए' अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला : सीआरपीसीच्या कलम 306 (4) (b) च्या संवैधानिक वैधतेला सचिन वाजेने या याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. त्यामुळं त्याबाबत देशाचे ॲटर्नी जनरल यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, केंद्रातर्फे 22 ऑक्टोबरची तारीख मागण्यात आली होती. आज या प्रकरणाची सुनावणी झाली. सचिन वाजेविरोधात दहशतवादी कृत्यांमुळं यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानी जिलेटिनने भरलेले वाहन सापडले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत वाजेची त्यात महत्त्वाची भूमिका असल्याचं समोर आलं होतं. त्याप्रकरणी अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट : सचिन वाजे एकेकाळी मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जात होता. डिसेंबर 2002 मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सचिन वजेला निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्याला पुन्हा पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात आलं होतं.
हेही वाचा -
- “लोकसभेत कळेल कोणाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा - Mp Sanjay Raut
- "सचिन वाजेंच्या कुबड्यावर देवेंद्र फडणवीसांचे आरोप"; अनिल देशमुखांचा हल्लाबोल, बावनकुळे म्हणाले, 'नार्को टेस्ट...' - Anil Deshmukh Allegations
- कैदेतील सचिन वाजेला प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी? वाजेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करण्याची कॉंग्रेसची मागणी - Atul Londhe On Sachin Waze