मुंबई Sanjay Raut : महाराष्ट्र राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट एक प्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवते अशी परिस्थिती आहे. ''मी आजही मुख्यमंत्र्यांच्या गँगमधील गुंडाचा फोटो ट्विट केलाय. कोण आहे हा लालसिंग जरा गृहमंत्र्यांना विचारा. अमित शाह हे नवीन कायदे लावू इच्छित आहेत. पण आधी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष घाला.'' अशी टीका राऊतांनी अमित शाहांवर केलीय.
विधानसभा बरखास्त करा : "या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय. या राज्याचा गुंडांनी ताबा घेतलाय. त्याच्यामुळं येथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी आमची मागणी आहे", असंही राऊत म्हणाले. "विधानसभा बरखास्त करा आणि ताबडतोब निवडणुका लावाव्या, नाहीतर गुंड येथे हैदोस घालतील. हा जो हैदोस सुरू आहे, लवकरच या संदर्भात महाविकास आघाडी या गुंडगिरी विरुद्ध कोणत्या प्रकारचे आंदोलन करावे, कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा या संदर्भात आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे, या सरकारच्या झुंडशाहीला, गुंडशाहीला जनतेचं आव्हान देऊ", असंही राऊत म्हणालेत.
बेड्या घालून रस्त्यावरुन फिरवा : "मी गेल्या 10 दिवसांपासून दररोज ठाणे, मुंबई, पुणे या संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या पक्षात सहभागी होणाऱ्या खतरनाक गुंडांना लोकांसमोर आणत आहे. मात्र, मुख्यमंत्री, गृहमंत्री हे गुंडांचं समर्थन करत आहेत. चार दिवसांपूर्वी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी एक शो केला. गुंडांची परेड केली व त्यांना सांगितलं की, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढणं बंद करा. मग काल तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला, त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी का काढली नाही?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. "वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावर जे हल्ले करणारे राजकीय गुंड आहेत, त्यांचीही परेड करा, त्यांनाही हातात बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावर फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात", असा गंभीर आरोपही राऊत यांनी यावेळी केलाय.
मुख्यमंत्र्यांचा उल्लेख फेकूचंद : करमचंद जासूस असं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं होतं. आता या फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार आहे? ते फेकूचंद असून गुंडांचे सरदार आहेत, हे चोरांची टोळी चालवत आहेत. करमचंद जासूसला प्रतिष्ठा आहे. या देशात एकेकाळी करमचंद जासूसनं खूप चांगलं काम केलं आहे. जरा त्यांनी इतिहास पाहावा आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावं. त्यासाठी थोडासा अभ्यास असावा लागतो, वाचन असावे लागते, आसपास गुंड नव्हे, बुद्धीमंत आणि विचारवंत असावे लागतात. रोज चार गुंडांबरोबर बैठका घेऊन बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत. आजच्या मुख्यमंत्र्यांबरोबर खंडणीखोर, बलात्कारी, खुनी हे असल्यामुळे त्यांना आसपास सर्वच करमचंद दिसत असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय.