अमरावती Amravati Wandering People :अमरावती शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, गाडगे नगर, शेगाव नाका या सिग्नलवर दुचाकी किंवा चारचाकी कोणतंही वाहन उभं असताना दोन वर्षापासून ते सात वर्षे वयोगटातील लहान मुलं वाहन चालकांकडून एखादा रुपया मिळेल, या आशेनं उभी असतात. अनेकदा ही मुलं पैसे द्याच, असा हट्ट देखील करतात. चौकातच जन्मलेली ही मुलं गाडीच्या चाकाखाली आली तर जबाबदार कोण? प्रशासन खरोखरच अशा दुर्दैवी घटनेची वाट पाहत आहे का? रस्त्यावर भटकणाऱ्या आणि चौकात कायमस्वरूपी बसणाऱ्या अनेक कुटुंबातील नागरिकांच्या समस्यांवर काही तोडगा निघेल का? या भटक्या लोकांच्या अडचणी, समस्या आणि त्यांच्या भावना कोणी जाणून घेणार का? यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
नेमकी परिस्थिती काय ? : 'स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती' हे अमरावती महापालिकेचं ब्रीदवाक्य आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून अमरावती महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपुलाखाली भटक्या समाजातील अनेक कुटुंबांनी ठाण मांडलाय. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील परिसराबरोबरच महत्त्वाचा राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक, शेगाव नाका हा संपूर्ण परिसर म्हणजे भटक्या लोकांचं हक्काचं विश्व. शहरातील महिला महाविद्यालय आणि नेहरू मैदान ही त्यांची हक्काची ठिकाणं. महिला महाविद्यालय, नूतन कन्या शाळा, न्यू हायस्कूल मेन ही शैक्षणिक केंद्र देखील देखील या भटक्या जमातींनी वेढलीय. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांनाच अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ट्रॅफिक सिग्नलच्या वेळी रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांनाही या मुलांकडून पैशांसाठी त्रास दिला जातो. अनेकदा ही मुलं दुचाकीला लटकवलेली पिशवी तसंच ऑटोरिक्षातील प्रवाशांचं सामान घेऊन पळ काढतात.
वाहनचालकांकडून करतात पैशांची मागणी : शहरातील मुख्य चौकातील उड्डाणपुलाखाली भटक्या जमातीची कुटुंबं दिवसभर ठाण मांडून बसतात. या कुटुंबातील लोक परिसरात फिरन खाद्यपदार्थ जमा करतात तर कधी-कधी उड्डाण पुलाखाली चुली करून मांस शिजवतात. भीक मागणं, दारू पिणं आणि एकमेकांशी वाद घालणं हाच या लोकांचा दिनक्रम. रात्रीच्या वेळी ही लोक राजकमल चौक, जयस्तंभ चौक लगतच्या रहिवासी भागात तसंच शहरातील विविध रस्त्यांवर भटकंती करून प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, लोखंड, टिन, टप्पर असं सर्व साहित्य गोळा करून विकतात. साहित्य विकून मिळणाऱ्या पैशातून ते आपल्या गरजा भागवतात. काही कुटुंबं रस्त्यावर फुगे वगैरे विकून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे विविध उद्योग हे सर्व लोक करत असले, तरी त्यांची मुलं चौकात वाहनचालकांकडून पैशांची मागणी करतात.
व्यावसायिकांना टेन्शन : महत्त्वाच्या चौकातील हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांकडे ही लोक आम्हाला पण काही खाऊ घाला, अशी थेट मागणी करतात. हॉटेल चालकांनाही दिवसभर या लोकांचा त्रास सहन कराना लागतो. चौकात असणार्या टीव्ही शोरूमसमोर या समाजातील मुलं आणि मोठे मंडळी ठाण मांडून जे काही सुरू असतं ते पाहण्याची मजा लुटतात. या मुलांमुळे आपल्या शोरूमचा रस्ता बंद होतो. कुणी ग्राहक येत नाही, यामुळे वैतागलेले व्यावसायिक दिवसातून 25 - 50 वेळा या मुलांना पिटाळून लावण्यासाठी मोठी कसरत करतात. भरधाव वाहतूक असणाऱ्या रस्त्यांवर ही मुलं चोर पोलीस, हात लावणी असे खेळ खेळतात. कधी-कधी भर चौकात क्रिकेटही खेळतात.
राजकीय आंदोलन, मोर्चे, मिरवणुकीत धमाल :शहरातील महत्त्वाचं चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकमल चौकात अनेकदा विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनं, निदर्शनं होत असतात. या काळात भटक्या जमातीतील अनेक स्त्री-पुरुष दारू पितात आणि मधात आनंद करतात. राजकीय आंदोलनासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अनेकदा आंदोलकांपेक्षा या लोकांवरच बारीक नजर ठेवावी लागते. चौकातून निघणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक मिरवणुकांमध्ये दारू पिऊन नाचणं धिंगाणा घालणं, पुरुषांसोबतच महिलांकडून देखील केलं जातं.