मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 20 जागाच जिंकता आल्या. कोकण, मराठवाड्यासह इतर भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
महायुती सरकारचं कौतुक : माध्यमांशी बोलताना खासदार कंगना रणौत यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. "विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. महायुती सरकारनं राज्यातील महिलांना 33 टक्के आरक्षण, मोफत धान्य, गॅस सिलेंडरची योजना सुरू केली," असं म्हणत त्यांनी महायुती सरकारचं कौतुक केलं.
महिलांचा अपमान करणाऱ्यांचा पराभव : उद्धव ठाकरेंचा इतका वाईट पराभव होईल याची तुम्हाला अपेक्षा होती का? असा प्रश्न विचारला असता कंगना म्हणाल्या, "महिलांचा अपमान करणाऱ्यांचा पराभव झाला. त्यांनी माझं घर फोडलं आणि माझ्याविरुद्ध अपशब्द वापरले. याचे परिणाम त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भोगावे लागले."
मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती? : मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असं विचारलं असता कंगना रणौत म्हणाला, "पक्ष यासंबंधी निर्णय घेईल. आमच्याकडे नेतृत्व करण्यासाठी एकापेक्षा एक लोक आहेत."
महायुतीचा पराभव : राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपाला 132 जागा, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला एकूण 46 जागा मिळाल्या. काँग्रेसला 16, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) 10 जागा जिंकता आल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा