चंद्रपूर : कोरपना येथे काँग्रेसच्या नेत्यानं आपल्याच शाळेतील अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय. मात्र, या प्रकरणात केवळ एक मुलगी नसून अनेक मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा दावा भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. तसंच या प्रकरणावरुन त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी विरोधी पक्षांवर आगपाखड केली.
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ? :चित्रा वाघ यांनी शुक्रवारी कोरपना येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा केली. तसंच सखोल तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले. "आरोपीनं यापूर्वी आपल्या चुलत बहिणीवर देखील अत्याचार केला होता. त्यानंतर त्यानं शाळेतील अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं. याची सखोल चौकशी झाल्यास ही बाब समोर येईल", असा दावा त्यांनी केला.
चित्रा वाघ पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चकार शब्द काढला नाही : पुढं मविआ नेत्यांवर निशाणा साधत चित्रा वाघ म्हणाल्या की, "इतकं गंभीर प्रकरण असूनही महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं यावर चकार शब्द काढला नाही, यावर निषेध नोंदवला नाही. बारामतीच्या मोठ्या ताई, सोलापूरच्या ताई, अमरावतीच्या ताई आणि उबाठा गटाचे सटरफटर बोलणारे नेते गप्प बसलेत. दिवसाला सहा ते सात ट्वीट करणारे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे गप्प आहेत. महिला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी साधं एक वक्तव्यही नाही केलं. कारण या नेत्यांना फक्त राजकारण करता येतं", असा आरोपही वाघ यांनी केला. तसंच मोहब्बत की दुकानात काय चाललंय? असा खोचक सवाल त्यांनी राहुल गांधी यांना केलाय. मुनगंटीवारांनी दिले निर्देश : हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची गंभीरपणे दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. शाळेतील व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करत आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.
काय आहे प्रकरण? : कोरपना येथे आरोपी अमोल लोडेच्या संस्थेची शाळा आहे. लोडे हा याच शाळेत शिक्षक देखील असून तो काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे. याच नराधम शिक्षकानं आपल्याच शाळेतील 12 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब 1 ऑक्टोबरला समोर आली. गुन्हा नोंद झाल्याचा सुगावा लागताच आरोपी अमोल लोडे पसार झाला होता. त्यानंतर त्याला अकोला बसस्थानकावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. त्यानं गुन्ह्याची कबुली देखील दिली. या गंभीर प्रकरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात आक्रोशाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसनं या आरोपीची पक्षातून हकालपट्टी केली. तर पीडिताच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोडे याच्यावर कलम 376 पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -
- सांस्कृतिक राजधानी हादरली: चालत्या स्कूल बसमध्ये चालकाचा दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार - Man Sexually Assaults To Girls
- बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचा फरार ट्रस्टी तुषार आपटे अटकेत; 'एसआयटी'कडं करणार सुपूर्द - Badlapur Girls Sexual Assault Case
- बीड हादरलं! वसतिगृहातून बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल - Minor Girl Molested