मुंबई - तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) आणि चिपी ते मुंबई सुरू केलेली विमानसेवा शनिवार (२६ ऑक्टोबर) पासून बंद करण्यात येत असल्याने कोकणवासीयांना याचा मोठा धक्का बसलाय. विशेष करून ही विमान सेवा सुरू झाल्यावर त्याचं श्रेय घेण्यासाठी कोकणातील अनेक नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती. परंतु आता ही विमानसेवा बंद होत असताना यासाठी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही.
तीन वर्षांचा करार संपुष्टात :अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी या मार्गावर विमान सेवा सुरू करण्यात आली होती. ही सेवा तीन वर्षांच्या करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. आता ही मुदत २६ ऑक्टोबर रोजी संपत असल्याने २६ तारखेपासून प्रवासासाठी तिकीट विक्री बंद करण्यात येणार आहे. कोकणवासीयांसाठी हा मोठा धक्का आहे. मुंबईतून कोकण आणि कोकणातून मुंबई गाठण्यासाठी ही विमान सेवा कोकणवासीयांसाठी फायदेशीर अशी होती. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही विमानसेवा बंद होत असल्याने याचा फटका जनतेसोबत नेत्यांनाही बसणार आहे.
विनायक राऊतांचं पत्र (ETV Bharat File Photo) बेभरवशाच्या सेवेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट :९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपी विमानतळावरून चिपी ते मुंबई असा प्रवास सुरू झाला होता. शिमगा, गणेशोत्सवाला आवर्जून कोकणात घर गाठण्याचा मुंबईकरांचा प्रयत्न या विमानसेवेमुळे सुखकर झालाय. कोकणवासीयांनीसुद्धा या विमानसेवेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. परंतु या विमानसेवेला कालांतराने अनियमिततेचे ग्रहण लागले. अनेकदा विमानाचे उड्डाण अचानक रद्द केले गेले. प्रवाशांना विमानतळावर अनेक तास ताटकळत बसावे लागले. मुंबई तसेच चिपी विमानतळावर प्रवासी पोहोचल्यावर अनेकदा आगाऊ बुकिंग करूनसुद्धा विमानांचे उड्डाण रद्द होणे असे प्रकार वारंवार होऊ लागलेत. या कारणाने बेभरवशाच्या सेवेमुळे प्रवाशांमध्ये अनेकदा संतापाची लाट उसळलीय.
सिंधुदुर्ग स्टेशन मॅनेजर (ETV Bharat File Photo) विनायक राऊत यांचं मंत्र्यांना पत्र :चिपी ते मुंबई विमानसेवा बंद होत असल्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना या संदर्भामध्ये पत्र लिहिलंय. विनायक राऊत म्हणाले की, कोकणवासीयांसाठी ही विमानसेवा अत्यंत महत्त्वाची असून, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही विमानसेवा बंद होता कामा नये. जेव्हा ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती, तेव्हा याचं श्रेय घेण्यासाठी नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेतला होता. परंतु आता ही विमानसेवा बंद होत असताना याकडे यांचं कुणाचंही लक्ष नाही. ही सेवा सुरू ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशी विनंती विनायक राऊत यांनी केलीय.
हेही वाचा :
- घड्याळ चिन्हाचा वापर करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'या' नियमाचे करावे लागणार पालन
- बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर