ठाणे Eknath Shinde On Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला 'अभिजात' भाषेचा दर्जा दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला 'अभिजात' भाषेचा दर्जा जाहीर झाला. नवदुर्गांचं आगमन झालं आहे, अशा वेळेस घेतलेला हा सरकारचा निर्णय ऐतिहासिक असून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या मागणीला आज सरकारने न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आनंद व्यक्त केला. "घटस्थापनेच्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार हे अलौकिक काम आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि अमित शाह, राजेंद्र शिकावर यांचं महाराष्ट्राकडून अभिनंदन करतो," असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिघांचंही अभिनंदन केलं.
ऐतिहासिक दिवस :मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक दिवस आहे. जगभरात साता समुद्रापार पोहोचलेल्या मराठी भाषेचा सन्मान करणाऱ्या मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. मराठीला 'अभिजात' भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारनं अनेकदा केंद्र सरकारकडं प्रयत्न केले होते. या सरकारनं यासाठी आग्रह देखील धरला होता आणि नीती आयोगाच्या बैठकीत देखील हा विषय राज्य सरकारनं मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर निर्णय घेत मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे."