मुंबई Cabinet Meeting In Mumbai :गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला असून, याचाच एक भाग म्हणून गुरुवारी 1 लाख 17 हजार 220 कोटी गुंतवणुकीच्या विविध प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे 29 हजार रोजगार निर्मिती होणार असून, तरुणांच्या हाताला काम देखील मिळणार आहे. गुरुवारच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत ऑनलाईन सहभागी झाले होते. यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सेमीकंडक्टर वाहन निर्मिती :यापूर्वीही उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या बैठकीतून दोन लाख कोटीच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पात साधारण पस्तीस हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यानंतर आता राज्यातील विविध भागात म्हणजे पुणे, पनवेल, मराठवाडा आणि विदर्भ, या ठिकाणी सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मिती होणार आहे. त्यामुळे इथं मोठी गुंतवणूक होणार असल्यानं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे. तसेच यामुळे महाराष्ट्राची नवी ओळख इलेक्ट्रिक वाहननिर्मिती अशी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.