महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालवण पुतळा दुर्घटना; सरकारकडून हात झटकण्याचा प्रयत्न, निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : 4 डिसेंबर 2023 रोजी 'नौदल दिना'च्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. मात्र आठ महिन्यांतच छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज या लोकोत्तर 'युगपुरुषा'चा फक्त पुतळा कोसळला नसून असंख्य शिवप्रेमी राष्ट्रभक्तांच्या अस्मितेचा चुराडा झाल्याची भावना सर्व थरातून व्यक्त होत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
एकनाथ शिंदे, दीपक केसरकर (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 4:27 PM IST

मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींसह राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी संबंधितावर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले असले, तरी शिवप्रेमींकडून या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, राज्य सरकार या प्रकरणी नौदलाकडे बोट दाखवून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे.

पालकमंत्र्यांची दिलगिरी पण प्रश्न कायम :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे 4 डिसेंबर 2023 रोजी 'नौदल दिना'निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. एकूण 35 फूट उंचीच्या पुतळ्यासह चौथर्‍याचं काम नौदलामार्फत तर किल्ल्याचा दरवाजा आणि तटबंदीचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलं होतं. पण सोमवारी अचानक हा पुतळा कोसळला. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मे. आर्टिस्टी यांचे मालक जयदीप आपटे, सल्लागार चेतन पाटील यांच्यासह पुतळा उभारणीच्या कामात समाविष्ट असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. "ही घटना अत्यंत वेदनादायी असून सर्व शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त करतो, याच ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्यात येईल," अशी सारवासारव त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर महिन्यात पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर पुतळा उभारणारे शिल्पकार जयदीप आपटे यांनी पुतळ्याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. 28 फूट उंचीचा बाँझचा पुतळा बनवण्यासाठी 3 वर्ष लागतात, परंतु आपण हा पुतळा जून महिन्यात बनवायला सुरुवात करून डिसेंबर पर्यंत तो पूर्ण केला. अवघ्या 7 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंचीचा पुतळा पूर्ण केला. 27 ऑक्टोबरपासून जोडकामाला सुरुवात केली. पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात असताना नौदलाच्या अधिकाऱ्यांनीही आपल्याला मदत केली, अशी माहिती जयदीप आपटे यांनी मोठ्या अभिमानाने दिली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं घाईगडबडीत हा पुतळा बनवल्याचं शिल्पकार जयदीप आपटे यांच्या मनोगतातून स्पष्ट होतंय. या कामासाठी जयदीप आपटे यांना नौदलाचं पूर्ण सहकार्य मिळालं असलं तरी पुतळा उभारणीचा कालावधी खूपच कमी होता, कारण कोणताही उंच पुतळा मजबूत आणि भक्कम करण्यासाठी कलाकाराला तेवढा वेळ देणं अत्यंत आवश्यक असतं. तितका वेळ आणि आवश्यक परिश्रम जयदीप आपटे यांनी घेतले नाहीत, हे स्पष्ट आहे.

शिल्पकारावर दबाव? :शिल्पकार गिरीश अराज यांनी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत बोलताना सांगितलं की, "पुतळ्याचं पदस्थल कमी आणि पुतळा हा अधिक उंचीचा करण्याचा निर्णय कोणताही शिल्पकार घेणार नाही. हा निर्णय शिल्पकारावर लादला गेला असावा. पदस्थल आणि त्यावरचा पुतळा यांचा मेळ घालण्याचं काम हे पूर्णपणे शिल्पकाराचं असतं. या कामासाठी शिल्पकाराला इतर यंत्रणांचेही सहकार्य अपेक्षित आहे. कमी कालावधीत पुतळा बनवण्याची जबाबदारी एखाद्या मूर्तिकाराला दिली व त्याच्यावर दबाव आणला तर असा प्रसंग उद्भवतो." या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याबाबत निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयाची तोडफोड केली.

पुतळा दिमाखानं व अधिक मजबुतीनं उभारला जाईल :याप्रकरणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पुतळा कोसळण्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचं आराध्य दैवत आहेत. या पुतळ्याचा आराखडा व त्याची उभारणी ही नौदलाकडून करण्यात आली होती. यासाठी कोणीही कायदा हातात घेण्याची गरज नसून, पुतळा पुन्हा एकदा दिमाखानं व अधिक मजबुतीनं उभारला जाईल. त्या भागात ताशी 45 किमी वेगानं वारे वाहत असल्याकारणानं या पुतळ्याचं नुकसान झालं," असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुतळा उभारणीवरून अनेक प्रश्न :पुतळा कोसळल्यानंतर याप्रकरणी शिवप्रेमी व विरोधकांकडून होणाऱ्या टिकेनंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. तो सुद्धा महाराष्ट्र सरकारनं उभारावा, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितलं. मात्र 'बूंद से गयी हौद से नहीं आती' च्या न्यायाने शिवरायांचा पुतळा बनवण्याच्या कामात प्रचंड हलगर्जी झाली, हे सत्य बदलणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले भक्कम भुईकोट किल्ले, जलदुर्ग आजही दिमाखात उभे आहेत, त्याच स्वराज्याच्या छत्रपतींचा पुतळा अत्याधुनिक तंत्रज्ञान दिमतीला असूनही दहा महिनेही तग धरु शकत नाही, ही शोकांतिका या प्रकरणातली अक्षम्य हेळसांड आणि संभाव्य भ्रष्टाचाराची कल्पना देऊन जाते. या प्रकरणावर आता सरकार पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत आहे का? एवढ्या घाईत पुतळा बनवण्याचं नेमकं कारण काय? 24 वर्षीय जयदीप आपटे यांना हा पुतळा बनवण्याचं काम कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आलं होतं? कल्याणमधल्या व्यक्तीला हे काम का देण्यात आलं? हा पुतळा कोणाच्या अंगावर पडला असता तर? असे अनेक प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. परंतु यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर सरकार देत नसून केवळ यातून हात झटकण्याचा प्रयत्न सुरू आहेत, याबद्दल सर्वसामान्य शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे.

हेही वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल, नौदलानं स्थापन केली चौकशी समिती - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

पंतप्रधान मोदी जिथं हात लावतात तिथं माती होते; संजय राऊतांचा हल्लाबोल म्हणाले 'महाराजांचा पुतळा पाहून काळजात चर्रर झालं' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue

"शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले भक्कमपणे उभे, पण..." महाविकास आघाडीचा महायुतीवर निशाणा - statue of chhatrapati shivaji

ABOUT THE AUTHOR

...view details