मुंबई Over Head Wire Break Down : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे 'मेगा हाल' झाल्याचं पाहायला मिळालं. आज (5 ऑगस्ट) दुपारी कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं त्याचा मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या दुरुस्ती पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे दोन तासांत वायर जोडली. त्यानंतर लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, यामुळं मध्य रेल्वेची मेन लाईनवरील वाहतूक 20 ते 30 मिनिटं उशिरानं सुरू राहिली आहे.
आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड तुटली. त्यामुळं अनेक स्थानकांवर लोकल गाड्या थांबल्या. प्रवाशांना लोकल ट्रेनमधून उडी मारून रेल्वे ट्रॅकवर चालावं लागलं. ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळताच रेल्वे दुरुस्ती पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि दोन तासांच्या प्रयत्नानंतर वायर जोडण्यात आली. रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी गाड्या उशिरानं धावत आहेत. प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी.- डॉक्टर स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मेल-एक्सप्रेसलाही गोंधळाचा फटका-याबाबत अधिक माहिती अशी की, ओव्हरहेडची दुरुस्ती करण्यासाठी ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळं ठाणे ते कल्याण आणि त्यापुढील लोकल वाहतूक बंद करण्यात आली. तसंच अप आणि डाउन दोन्ही मार्गावर लोकल धावत नसल्यानं ठाण्याच्या पुढील सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. मध्य रेल्वेनं दुपारी 3 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास अप मार्गावर 15 किमीच्या वेगानं लोकल चालविण्यास सुरुवात केली. परंतु, गाड्या एका मागोमाग एक उभ्या राहिल्यानं गाड्यांचं बंचिग झाले होते. अनेक मेल-एक्सप्रेसलाही या गोंधळाचा फटका बसला.