सोलापूर : महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सोलापूर शहरात कन्नड आणि तेलुगु भाषिक नागरिक राहातात. सोलापूरची 'कडक भाकरी' आणि 'शेंगाची चटणी' ही जगप्रसिद्ध आहे. बरेच दिवस टिकणाऱ्या या भाकरीबद्दल सर्वांनाच कुतुहूल असतं. तर सोलापूर शहरातील एका फाउंडेशननं आणि भाकरी केंद्रातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि युवा दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूरच्या भाकरीला राज्यात प्रसिद्धी मिळावी यासाठी भाकरी बनवण्याच्या स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सोलापूर हे ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जातं.ज्वारीपासून भाकरी तयार केली जाते. या भाकरीला राज्या बाहेर स्थान मिळावं यासाठी या भाकरी स्पर्धामधून प्रयत्न केला जात आहे. - काशिनाथ भतगुणकी, आयोजक
केवळ हातानं भाकरी तयार करण्याची राज्यस्तरीय भाकरी स्पर्धा : सोलापूर शहरातील एका फाउंडेशननं आणि भाकरी केंद्रातर्फे दिनांक ११ आणि १२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत राज्यस्तरीय भाकरी बनवण्याची स्पर्धा जुळे सोलापुरातील एका सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. बेकारीपासून आणि मुक्तीसाठी भाकरी ही संकल्पना घेऊन केवळ हातानं भाकरी बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती, संयोजिका संगीता भतगुणकी यांनी दिली.
उत्तम भाकरी करणाऱ्या महिलांचा बक्षीस देऊन सन्मान : राज्यस्तरीय भाकरी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना पीठ, गॅस शेगडी, चूल आणि इतर साहित्य देण्यात आले आहे. स्पर्धेतील महिलांना दोन तासात सर्वाधिक भाकरी गोल आणि पातळ बनवणाऱ्या विजेत्यांना प्रथम अकरा हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये, तृतीय पाच हजार, चतुर्थ दोन हजार आणि पाचव्या क्रमांकाचे एक हजार रुपये बक्षीस तसेच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पूर्ण अहेर देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
भाकरीला सन्मान देण्यासाठी स्पर्धा : "सोलापुरात मालदांडी ज्वारी प्रसिद्ध आहे. मशीनपेक्षा हाताच्या भाकरीला चव असते. या स्पर्धेत सोलापुरातील साडे चारशे महिलांनी सहभागी घेतला आहे. भविष्यात सोलापूरच्या भाकरीला ओळख मिळावी. यासाठी ही राज्यस्तरीय भाकरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेमध्ये ही भाकरी प्रसादामध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिनांक 26 जानेवारी ते 6 फेब्रुवारी रोजी कलबुर्गी इथं 25 लाख लोकांचा महासंस्कृती महोत्सव होणार आहे. तेथे ही भाकरी प्रसादासाठी मोफत देण्यात येणार आहे. भविष्यात गरम भाकरीचा उद्योग सुरू करणार आहे," असं काशिनाथ भतगुणकी यांनी सांगितलं.
हेही वाचा -