मुंबई CBI Arrested Custom Officer : चीनमधून आयात केलेल्या मशीन पार्टवर मुंबईतील सहार विमानतळावर असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधीक्षकानं लाच मागितली. याप्रकरणी सीबीआयनं या सीमा शुल्क अधीक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. "सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) नं तक्रारदाराकडून 80 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल कस्टम्स, कुरिअर सेल, इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल, मुंबईच्या अधीक्षकाला अटक केली आहे," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
चीनमधून आयात केले मशीन पार्ट :सीबीआयनं आरोपीविरुद्ध लाच लुचपत विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तक्रारदारानं चीनमधून काही मशीन पार्ट आयात केले होते. हे मशीन पार्ट 6 जुलैला कुरिअर फर्मद्वारे मुंबई इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर पोहोचले. यावेळी आरोपींनी तक्रारदाराला त्यानं आयात केलेल्या मालाच्या सुटकेसाठी दोन लाख 80 हजार रुपये अँटी डंपिंग शुल्क भरण्यास सांगितलं. त्यानंतर आरोपीनं तक्रारदारास एक लाख 40 हजारचा अवाजवी फायदा म्हणजे 50 टक्के मूल्य भरल्यास 2 लाख 80 हजार रुपये अँटी डंपिंग ड्युटी न भरता खेप सुरक्षित करण्याचं आश्वासन दिलं, असा आरोप तक्रारदारानं केला.