मुंबई Opposition Boycott Government Tea Party : उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. फसव्या सरकारच्या चहापाण्याला जाण्यास विरोधकांना कुठलाही रस नसल्याचं सांगत विरोधकांनी सरकारच्या चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. आज सर्व विरोधी पक्षांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी निवासस्थानी एकत्रित बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गुंडा राज : "सरकारकडून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला चहापाण्याचं निमंत्रण आलं आहे. मात्र, या फसव्या सरकारच्या चहापाण्याला जायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. हे सरकार राजकारणाचं गुन्हेगारीकरण करत आहे," असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. "दिवसाढवळ्या सत्ताधारी पक्षातील आमदार गोळीबार करतात हे गंभीर असून राज्यात गुंडाचा राडा सुरू आहे," असा घणाघातही त्यांनी केला आहे. "मंत्रालयात गुंडाचे रिल्स काढले जात आहेत. राज्यात अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती," असही ते म्हणाले आहे.
मराठा समाजाला या सरकारने फसवलं : पुण्यात 2200 कोटीचे ड्रग्ज पकडले जात आहेत. भाषेचा स्थर खलावलेला आहे. भाजपाचा एक आमदार पोलिसांच्या बद्दल आणि त्यांच्या पत्नीबद्दल खालच्या स्तराची भाषा वापर असल्याचं सांगत त्यांनी नाव न घेता भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. तसंच, राज्याला खड्यात घालण्याचं काम हे सरकार करत आहे असंही ते म्हणाले आहेत. या सरकारने मराठा समाजाला या सरकारने फसवलं असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला आहे.
पीक विमा कंपन्यांची दादागिरी सुरू : या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते. "राज्यात पोलीस भरती किंवा अन्य भरती प्रक्रियेत गँग काम करतेय. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. पीक विमा कंपन्यांचं भलं झालं आहे. परंतु शेतकऱ्याला विमा भेटला नाही. शासन आपल्या दारी, पण लोकांना सरकारच्या दारी जावं लागत आहे. पीक विमा कंपन्यांची दादागिरी सुरू आहे. महानंदा डेअरी गुजरात जाणार अशी शंका आहे," असे अनेक आरोप करत दानवे यांनी सरकावर यावेळी जोरदार टीका केली.