मुंबई BMC In Action Against Pollution : वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असून, पालिका प्रशासनानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर संयुक्तपणे ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत पालिका प्रशासनानं 77 बेकऱ्या व 286 बांधकामांना काम बंद करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यापैकी 77 बेकऱ्या पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत पालिका प्रशासन असून याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याची माहिती बृहनमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
77 बेकऱ्या बंद करण्याचा निर्णय : मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं पालिका डीप क्लीन ड्राईव्ह, अँटी फॉर्म मशीन यांसारखे विविध प्रयोग आणि उपकरणं वापरात आणत आहे. मात्र, तरी देखील मुंबईतील प्रदूषणाचा टक्का कमी होत नसल्यानं आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, कोळसा आणि भांगरतील लाकडावर चालणाऱ्या 77 बेकऱ्या प्रदूषण पसरवल्याप्रकरणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसंच, 225 पारंपरिक लाकडी दहन आधारित स्मशानभूमी पीएनजी आणि विजेमध्ये रुपांतरित करण्याचं काम सुरु आहे.
काय म्हणाले आयुक्त : मुंबईत सुरु असलेल्या बांधकामांमुळे उडणारी धूळ हवा प्रदूषित करते, यावर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जोर दिला. अशी बांधकामं बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषणाबाबत पालिकेनं ज्या गाईडलाईन जारी केल्या आहेत, त्यांचं पालन न करणाऱ्या बांधकामांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून, त्यांना बांधकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बांधकाम व्यवसायिकांनी पुढील 24 तासांत काम न थांबवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून हा अजमीन पात्र गुन्हा असेल, अशी माहिती देखील आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. भायखळा आणि बोरिवली इथं मोठ्या प्रमाणात इमारतींची कामं सुरु असून ते काम तातडीनं थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे.
काम थांबवण्याच्या नोटीस : याबाबत पालिका प्रशासन दिलेली अधिक माहिती अशी की, मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागातील प्रतिनिधी मिळून एक टीम तयार करण्यात आली असून, यात घनकचरा व्यवस्थापन, इमारत प्रस्ताव विभाग, पर्यावरण वातावरणीय बद्दल विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि वॉर्ड ऑफिस यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व टीमनं एकूण 877 बांधकाम साईटला व्हिजीट केलं असून, या ठिकाणी पालिकेनं जारी केलेल्या 28 मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जात आहे का याची तपासणी केली. ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या तिथं कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 286 ठिकाणी काम थांबवण्याची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली आहे. आता यापुढं देखील सदर कार्यवाही सातत्यानं सुरु राहणार असल्याचं देखील पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- मुंबईतील ‘हे’ शांत समुद्र किनारे तुम्हाला माहीत आहेत का? जिथे निवांतपणे तुम्ही ईयर एन्डींग सेलिब्रेशन करू शकता