ठाणे :ठाणे ते बोरवली हे अंतर केवळ 23 किमी आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अनेक तासाचा प्रवास करवा लागत होता. घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेलमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत दोन भूमिगत बोगद्यांना मंजुरी दिल्यानं लवकरच सर्वांना दिलासा मिळणार आहे. आता हेच 23 किमीचं अंतर अवघ्या वीस मिनिटांत पार करता येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अध्यक्ष संजय मुखर्जी यांनी दिली.
वाहन चालकांना मिळणार दिलासा : ठाणे ते बोरवली प्रवास वाहन चालकांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतोय आहे. मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली तसंच ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गानं जोडून आता हेच अंतर लवकर कापता येणार आहे. त्यासाठी 10.25 किमीचा बोगदा, 1.55 किमीचा मार्ग असा एकूण 13.05 मीटर व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा तयार करण्यात येणार आहे. सादर बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपात्कालीन मार्ग देखील बांधण्यात येणार आहेत. या बोगद्याच्या प्रत्येक 300 मिटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज, प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पातील बांधकाम हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चार टनल बोरिंग मशीनच्या मदतीनं करण्यात येणार आहे. सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43 किमी लांबीचा मार्ग हा ठाणे जिल्ह्यातून तर, 7.4 किमी लांबीचा मार्ग हा बोरिवलीमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.