पुणे : पुणे शहरातील बोपदेव घाट येथं एका मुलीवर तीन जणांकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात आत्ता पुणे पोलिसांनी एका नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. तर दोन आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
700 पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास : पुण्यातील शिवाजीनगर येथे आज पुणे शहर अंतर्गत विविध प्रकल्पांचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या भाषणात याबाबत माहिती दिली. यावेळी अमितेश कुमार म्हणाले की, "मागच्या आठवड्यात महिला सुरक्षिततेच्या बाबत एक गंभीर घटना पुणे शहारत घडली होती. आता या घटनेचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलं असून याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. तर 2 आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यासाठी 7 दिवस लागले असले, तरी जवळपास 700 पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली."