शिर्डी (अहिल्यानगर) - श्रद्धा - सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डीतील साईबाबांचे मंदिर देश-विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देतात. नवीन वर्षा निमित्तानंदेखील साईभक्तांनी भरभरून दिले आहे. मागील शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तब्बल दोन कोटींचे दान भाविकांनी साईचरणी अर्पण केलय. यामध्ये जम्मू काश्मीरच्या जोडप्यानं 13 लाखांचा सोन्याचा हार साईचरणी अर्पण केला आहे.
मूळचे जम्मू काश्मिर येथील रहिवासी असलेले टिकू परिवाराची शिर्डी साईबाबांवर प्रचंड श्रद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून बबिता टिकू या शिर्डीत स्थायिक झाल्या आहेत. तर त्यांचे पती नवीन टिकू हे व्यवसायासाठी दिल्लीत असतात. खूप वर्षांपासून साईबाबांना काही तरी भेटवस्तू देण्याची त्यांच्या पत्नीची इच्छा होती. पत्नीचा इच्छेचा मान ठेवत त्यांनी नवीन वर्षा निमित्तानं शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल 206 ग्रॅम वजनाचा आणि 13 लाख 30 हजार 348 रुपये किमतीचा सोन्याचा हार भेट स्वरुपात दिला. या हारावर अत्यंत आकर्षक असे नक्षीकाम आहे.
साईंनी सर्वकाही दिलं आहे. त्यांचेच त्यांना परत करत आहे. खूप दिवसांपासून पत्नीला भेट द्यायची होती. ही इच्छा आता पूर्ण झाली आहे- साईभक्त, नवीन टिकू
नवीन वर्षाच्या पहिल्यादिवशापासून साईभक्तांनी मोठ्या प्रमाणात सुवर्णदान केलं. टिकू या साईभक्त परिवारानं साईबाबा संस्थानला दान दिलेला हार भाविकाचा इच्छेनुसार साईबाबांच्या धुपआरतीचा वेळी साईमूर्तीला चढवण्यात आला होता. त्यानंतर टिकू यांनी हा सुवर्ण हार साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द केलाय. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त टिकू यांचा शाल आणि साईमूर्ती देवून सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
- साईभक्तांनी दिले भरभरून दान- नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनानं व्हावी, विविध राज्यांतील साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीनं यंदाही 31 डिसेंबर रोजी साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवलं होते. नाताळ आणि नवीन वर्षा निमित्तानं शिर्डीत झालेली साईभक्तांनी साईबाबांना भरभरून दान दिल्याचं दिसून आले.
हेही वाचा-