मुंबईBogus job racket busted : अंधेरी पूर्व येथील लीला हॉटेलजवळील द एव्हेन्यू बिल्डिंगमध्ये बोगस जॉब रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बोगस जॉब रॅकेटच्या कार्यालयावर गुन्हे शाखेच्या आठ कक्षानं कारवाई केली आहे. गुन्हे शाखा कक्ष 8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी सांगितलं की, शुभम अरविंद पुंडीर (वय 25), शुभम प्रदीप डे (वय 23), स्वप्नील सुनील नाईक (वय 34) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक : याप्रकरणी नुकताच सहार पोलीस ठाण्यात पीडित तरुणानं दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम 419, 420, 465, 468, 471, 120ब तसंच 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा पुढील तपासातही कक्ष 8 कडं वर्ग करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 8 च्या कार्यालयास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. काही इसमांनी कट रचून परदेशात नोकरीस इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक केलीय. त्यांनी दी ॲव्हेन्यु बिल्डींग, आयए प्रोजेक्ट रोड, चिमनपाडा,येथे ऑफिस सुरू केलं होतं. तरूणांना परदेशात वेगवेगळया नामांकित कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केलीय. तरूणांना परदेशातील वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे बनावट जॉब ऑफर लेटर, संबंधित देशांचा बनावट वर्क व्हिसा आरोपींनी दिला होता. या प्रकरणात आरोपींनी प्रत्येकी लाखो रूपये वेगवेगळया बँक खात्यावर तसंच रोख स्वरूपात स्विकारले जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून कक्ष 8 ला मिळाली होती.