मुंबई BMC Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं चिंता व्यक्त केली जात असतानाच पालिका प्रशासनानं राज्य सरकार आपल्याला अतिरिक्त पाणीपुरवठा करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र, मुंबईकरांना कोणत्या ना कोणत्या कारणानं पालिकेच्या पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. आता पालिकेनं पी दक्षिण विभाग म्हणजेच गोरेगाव पूर्व येथील विरवानी इंडस्ट्रियल इस्टेट भागातील पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी 23 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान 24 तासांसाठी शंभर टक्के पाणी कपात करणार असल्याचं जाहीर केलय. मुंबईतील इतरही काही भागांमध्ये काही ना काही कारणास्तव पाणी कपातीचा नागरिकांना सामना करावा लागतोय. त्यामुळं तांत्रिक दुरुस्तीचं कारण देत पालिका मुंबईत पाणी कपात करतेय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालिकेनं काय म्हटलंय : गोरेगावच्या शंभर टक्के पाणी कपातीबाबत पालिकेनं म्हटलंय की, गोरेगाव पूर्व येथील विरवानी इंडस्ट्रियल इस्टेट जवळील जलवाहिनी बदलण्यासाठी 23 एप्रिल मंगळवार ते बुधवार 24 एप्रिलला सकाळी दहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत शंभर टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळं या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. गोरेगावच्या पूर्वेला वेस्टन एक्सप्रेस हायवे असून या हायवे परिसरात 600 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून 900 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामाला किमान 24 तास वेळ लागणार असल्यानं या भागातील पाणीपुरवठा 100% खंडित केला जाणार आहे.
'या' विभागांच्या पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम : पालिकेनं जाहीर केलेला 24 तासांसाठी खंडित होणारा पाणीपुरवठा हा फक्त गोरेगाव पूर्व भागासाठी मर्यादित असला तरी त्याचा परिणाम आजूबाजूच्या भागातील पाणीपुरवठ्यावर देखील होणार आहे. यात पी दक्षिण विभागातील वीटभट्टी वसाहत, कोयना वसाहत, स्टॉकर वसाहत, रोहिदास नगर आणि शर्मा इस्टेट, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, आर दक्षिण विभागातील बानडोंगरी, कांदिवली पूर्व, पी पूर्व विभागातील दिंडोशी डेपो, गोकुळधाम, पिंपरीपाडा, जानू कंपाऊंड, राणी सती मार्ग यांचा समावेश आहे.