मुंबई Navratri 2024 :नवरात्रीत भव्य दुर्गापूजेचं आयोजन करण्याबरोबरच गरबा आणि दांडिया (Dandiya) खेळण्याचाही ट्रेंड आहे. विशेषत: नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गरबा आणि दांडिया नृत्य गुजरातच्या रस्त्यांवर तसंच इतरत्र देखील सर्रास पाहायला मिळतं. तर मुंबई भाजपाच्या वतीनं भव्य मराठी दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे.
भव्य मराठी दांडियाचं आयोजन : मुंबईतील काळा चौकी येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीनं 'भव्य मराठी दांडियाचं' आयोजन करण्यात आल्याची माहिती, प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा, महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी पाच दिवस चालणारा हा दांडिया यावर्षी सात दिवस असणार आहे. या भव्य मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावं, असं आवाहन भाजपानं केलय.
मराठी दांडियाचा मान भाजपाचा : यावेळी बोलताना कोटेचा म्हणाले की, मुंबईतील पहिला मराठी दांडिया भाजपानं सुरू केला. या उपक्रमाचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे. या मराठी दांडियाला गेली दोन वर्ष उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला या मराठी दांडियासाठी दरवर्षी मोफत प्रवेश देण्यात येतो. यंदा सात दिवस रोज मराठी पेहरावात उत्तम सादरीकरण करणाऱ्या एक महिला आणि एका पुरुषाला एक-एक आयफोन बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसंच गुणांकांमध्ये जर दोघांमध्ये बरोबरी झाल्यास त्या दोघांनाही एक-एक आयफोन देण्यात येणार आहे. या मराठी दांडियासाठी नि:शुल्क प्रवेश पत्रिका ही आपलं ओळख पत्र दाखवून मध्य आणि दक्षिण मुंबईतील भाजपाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आल्याची माहिती कोटेचा यांनी दिली.
पहिला दांडिया आमचाच : मुंबईतील पहिला मराठी दांडिया भाजपानं सुरू केला असताना, याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा टोला कोटेचा यांनी विरोधकांना लगावला. उत्साहाच्या वातावरणात मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावं, असं आमंत्रण भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलं. यावेळी चित्रपट, मालिका कलावंतांची उपस्थिती, वाद्यवृंदाचा ठेका आणि नेटके संयोजन असलेल्या या मराठी दांडियाची रंगत सर्वांना आवडेल. अवधूत गुप्ते यांनीही मराठी दांडियासाठी आमच्या वादकांचा हात आणि माझा गळा सज्ज आहे. तेव्हा मराठी दांडियाच्या ठेक्यावर धमाल करण्यासाठी आणि आयफोन जिंकण्यासाठी सर्वांनी यावं असं यावेळी सांगण्यात आलं.
हेही वाचा -
- Dandia Fake Pass Case : बनावट गरबा पासच्या विक्री प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा
- Navratri 2023 : दांडिया, गरब्यासाठी तरुणींची वॉटरप्रूफ एचडी मेकअपला पसंती...