मुंबईMihir Koteja Statement: पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. या टप्प्यात मुंबईचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून, आरोप-प्रत्यारोपांमध्ये वाढ झाली आहे. याला निमित्त ठरलंय मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेलं चर्चासत्र. मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना 'मुंबई शहराच्या विकासाच्या दृष्टीने तुमचे व्हिजन काय?' या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चासत्राला सर्वच नेते उपस्थित होते; मात्र, ही चर्चा जेव्हा मूळ विकासाच्या मुद्द्यावर आली त्यावेळी संजय दिना पाटील यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला. त्यांना चर्चासत्राला पुन्हा आमंत्रित करण्यासाठी आयोजकांकडून अनेक फोन देखील करण्यात आले. मात्र, ते चर्चासत्राला उपस्थित राहिले नाहीत. यावरून आता ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना भाजपा उमेदवार विहीर कोटेजा यांनी थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे.
मानखुर्द शिवाजीनगरचे फक्त शिवाजी नगर करणार :ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजपा नेते मिहीर कोटेजा यांनी या संदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना माझं चर्चेचं खुलं आव्हान आहे. तुमच्यासोबत मतदारसंघाच्या विकासाची खुली चर्चा करायला मी कधीही तयार आहे. त्या दिवशी तुम्ही चर्चेतून पळ काढला. आयोजकांनी १५-१५ फोन करूनही चर्चेतून पळ काढला. नरेंद्र मोदी मुंबईत प्रचारासाठी येणार या नुसत्या विचारानेच वेड लागल्यासारखे बडबडत आहात."मिहीर कोटेजा यांनी पुढे म्हटलं आहे की, "मी सगळ्यात पहिले सांगू इच्छितो की, ज्या दिवशी मी निवडून येईल तेव्हा मानखुर्द शिवाजीनगरचे नाव फक्त शिवाजी नगर करणार. छत्रपतींच्या आशिर्वादाने झाकीर नाईकच्या अवलादींचे सगळे काळे धंदे, ड्रग्स असो की गुटखा की मटका सगळं बंद करणार. नियोजित कार्यक्रमातून तुम्ही आयोजकांनी पंधरा फोन केले तरी तुम्ही पळ काढला. हे पहिल्यांदाच झालंय असं नाही. तरी तुम्ही सांगाल तिथे यायला मी तयार आहे. मुंबईच्या विकासबद्दल १ टु १ चर्चा करायला मी तयार आहे. माझं चॅलेंज स्वीकारून तुमच्यावरचा पळकुटेपणाचा आरोप पुसण्याची तुम्हाला संधी देत आहे."