नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून महायुतीमधील आमदारांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज बौद्धिक घेण्यात येणार आहे. या बौद्धिकाला उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे हजर राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार का, याबाबत संदिग्धता व्यक्त होत आहे.
Live updates
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) दुसरे सरसंघचालक एम.एस.गोळवलकर यांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " माझे राष्ट्रीय स्वयंसेवकाबरोबर लहानपणापासून नातं आहे. मी लहानपणी संघाच्या शाखेत जायचो आहे. संघ जोडणारा असून तोडणारा नाही. शिवसेनचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारसारखे आहेत".
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमसर येथील आमदार राजू कारेमोरे संघाच्या स्मृती मंदिरात दाखल झाले आहेत.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार संघाच्या मुख्यालयात आले असले तरी अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे एक-दोन आमदार वगळता उर्वरित आमदार आलेले नाहीत
- मंत्रिपदापासून वंचित राहिलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारदेखील बौद्धिकासाठी संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत.
संघाकडून राष्ट्रवादी-शिवसेनेच्या आमदारांना निमंत्रण- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक असलेल्या हेडगेवार यांच्या स्मृती भवन परिसराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते भेट देणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांच्या आमदारांनादेखील संघाकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. उपस्थित संघ पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन बौद्धिक मार्गदर्शनही करणार आहेत.
- संघाच्या बौद्धिकाला शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते आमदार हजेरी लावणार? कोणते आमदार गैरहजर राहणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून काय बौद्धिक दिले जाईल? हादेखील उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
काय असते बौद्धिक?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) बौद्धिक म्हणजेच संघाच्या विचारांचा प्रसार करण्याचा उपक्रम आहे. 'बौद्धिक' शब्दाचा अर्थ 'बुद्धिमत्ता' किंवा 'ज्ञानवर्धन' असा आहे. या कार्यक्रमांमध्ये संघाचे विचार, तत्त्वज्ञान, भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर चर्चा केली जाते. हे कार्यक्रम संघाच्या सदस्यांना आणि समर्थकांना संघाचे उद्दिष्ट, संस्कृती, आणि समाजविषयक दृष्टिकोन समजावून सांगण्यासाठी आयोजित केले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक कार्यक्रम समाजाच्या एकतेवर, राष्ट्रवादावर आणि हिंदू संस्कृतीवर आधारित असतात. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत विचारवंताची चर्चासत्रे आणि व्याख्यानांचं आयोजन केलं जाते.