मुंबई Assembly Elections 2024:विधानसभा निवडणुकीला जेमतेम ३ महिन्यांचा अवधी उरलेला असताना सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीत मुसंडी घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाचे राज्याचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव त्याचबरोबर सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईसह महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईत याबाबत बैठकांचा सपाटा सुरू आहे. अशामध्ये जागा वाटपाचा मुद्दा हा कळीचा ठरणार असून भाजपा २८८ जागांचा आढावा घेत आहे.
पराभवानंतर जिंकण्याची सुवर्णसंधी :लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला एकहाती बहुमत मिळवता आलं नाही; परंतु मित्र पक्षांच्या सोबतीनं नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. महाराष्ट्रात झालेला भाजपाचा पराभव भरून काढण्यासाठी भाजपाला विधानसभेची संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं भाजपा पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असून त्या पद्धतीची रणनीती आखली जात आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी केंद्रीय मंत्री, भूपेंद्र यादव त्याचबरोबर सहप्रभारी केंद्रीय मंत्री, अश्विनी वैष्णव मागील दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. गुरुवारी भाजपा कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर शुक्रवारीसुद्धा भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडत आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ जागांपैकी १५० जागांचा आढावा गुरुवारच्या बैठकीत घेतल्यानंतर १५१ ते २८८ जागांचा आढावा शुक्रवारी घेतला जाणार आहे. भाजपा राज्यात १६० ते १७० जागा लढण्याच्या तयारीत असून इतर उरलेल्या जागांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस गट तसंच मित्र पक्ष यांना सामावून घ्यावे लागणार आहे.
जो जिंकेल त्याची जागा :या बैठकीबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जागा वाटपाबाबत ज्याची जिंकण्याची क्षमता त्याची जागा या आधारावर जागावाटप ठरवलं जाणार आहे. त्यासोबत सध्याच्या घडीला ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत, त्याबाबतही विचारमंथन सुरू आहे. शेवटी केंद्रीय नेतृत्व, पार्लमेंटरी बोर्ड बसून याबाबत निर्णय घेईल; परंतु महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी भाजपाने कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, याबाबत आम्ही रणनीती आखत आहोत, असंही बावनकुळे म्हणाले.