बीड- केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा पवनचक्कीच्या आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिक कराडनं व्हिडिओ जारी करत सीआयडी कार्यालयात शरण येत असल्याच जाहीर केलं होतं. "राजकीय हेतूनं आपल्यावर आरोप होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंध नाही," असा दावा कराडनं व्हिडिओमध्ये केला आहे. दरम्यान वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं पथक केजकडं रवाना झालं आहे.
Live updates
वाल्मिक कराडविरोधात केस लढण्यास सरकारी वकिलाचा नकार :
- बीड इथल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला सीआयडी अधिकाऱ्यांनी केज न्यायालयात दाखल केलं. मात्र वाल्मिक कराडविरोधात खटला लढण्यासाठी सरकारी वकिलांनी नकार दिला. वैयक्तिक कारणामुळे आपण खटला लढणार नसल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयात पत्र सादर केलं. त्यामुळे या खटल्यात नवीन सरकारी वकील म्हणू बी बी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
- पुणे : केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्कीच्या आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण आला आहे. तब्बल दोन ते तीन तासांच्या चौकशीनंतर कराड याला घेऊन केज न्यायालय इथं घेऊन जाण्यात आलं असून रात्री उशिरा कराड याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड म्हणाले, की "केज पोलीस स्टेशन येथील खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी वाल्मिक कराड हा सकाळी साडे बारा वाजल्याच्या सुमारास स्वतः हुन सीआयडी मुख्यालय येथे शरण आला आहे. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतला आहे. त्याची चौकशी करून आमच्या टीमसह बीड येथे रवाना करण्यात आलं आहे. याबाबत सीआयडीचे डीवायएसपी तपास करत असून त्यांच्या ताब्यात या फरार आरोपीला देण्यात आलं आहे," असं यावेळी आव्हाड म्हणाले.
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर कारवाईची मागणी लावून धरणारे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले," मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारवाईमुळे कराडला शरण यावे लागले. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारे यांच्यावरदेखील खुनाचा गुन्हा दाखल करा. त्यांची संपत्ती जप्त करा. कंपनी अधिकाऱ्याचं अपहरण करून खंडणी मागितली जायची. खंडणी मागण्यासाठी कोण माणसं पाठवायचे? सुदर्शन घुलेचादेखील हत्येत सहभागी आहे. सरकारचे नाव खराब होत आहे. पण, मी पावणेतीन तालुक्यांचा आमदार आहे. मी छोटा माणूस आहे. बीड प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांची नियुक्ती करावी. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे अजित पवार यांनी ठरवावे. हा अधिकार त्यांचा आहे. आरोपींची सर्व संपत्ती जप्त करावी, अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल".
- पुढे आमदार धस म्हणाले, " संपत्ती जप्तीची भीती आणि त्यांच्या घरातील लोकांची चौकशी या कारणानं ते शरण आले आहेत. स्वखुशीनं शरण आले नाहीत. संतोष देशमुख हा अमानवीपणे खून झाला आहे. पालकमंत्री हा झंटाफंटा कार्यक्रम आहे. त्यांचे सोडून द्या. विशेष बाब म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकत्व स्वीकारावे. यापूर्वी त्यांनी नक्षलवादी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावे. वाळूचोर, राखचोर, मुरुमचोर यांना सरळ करण्यासाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारावी. तपास झाल्यानंतर आकावर (वाल्मिक कराड) ३०२ चा गुन्हा दाखल होईल.
- वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर त्याला केज न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहेत.
- कराडच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली आहे. सर्व तपास यंत्रणा मॅनेज असून वाल्मिक कराडचे सर्व राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची टीका दमानिया यांनी केली.
- वाल्मिक कराड शरण येणार असल्याच्या शक्यतेनं पुण्यातील सीआयडी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
- संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. "संतोष देशमुख यांच्या हत्येनं समाज खवळला आहे. आरोपींसह आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक करा," अशी मागणी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी केली. "सरकारला सोपे जाणार नाही. आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. आमदार, मंत्री, खासदार आणि कोणी असले तरी सोडू नका," अशी मागणी जरांगे यांनी केली.
- सरपंच देशमुख यांच्या निषेधार्थ यवतमाळ, वाशिम आणि गोंदिया जिल्ह्यातील हजारो ग्रामपंचायती ३ दिवस कामबंद आंदोलन करणार आहेत.