मुंबई : Balasaheb Thackeray Jayanti 2024: मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर लढत राहिले. मराठी माणसांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली. तसंच, ज्वलंत हिंदूत्वाचा त्यांनी कायम पुरस्कार केला. अंगावर भगवा कुर्ता, भगवी लुंगी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, आणि सर्वांच्या लक्षात राहीला तो ठाकरी आवाज, हे खरं त्यांच चित्र होतं. त्यांच्या बोलण्यात जो ठाकरी बाणा होता तोच बाणा त्यांच्या जगण्यात आणि वागण्यात अखेरपर्यंत राहीला. बाळासाहेबांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका कधी फिरविली नाही. आपल्या भूमिकेवर कायम ठाम राहणं, हा त्यांचा महत्वाचा पैलू. ते बोलतानाचं म्हणायचे,"माझे शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी आहे. एकदा सुटली की सुटली. पुन्हा पाहायचं नाही कुठे पडली अन् कुणाला लागली". असा एकंदरीत त्यांचा ठाकरी बाणा होता.
जे स्वप्न पाहिलं ते काल झालं पूर्ण : महाराष्ट्रातच मराठी माणसाची होणारी गळचेपी, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद असो, बाबरी मशिदीचा मुद्दा असो किंवा थेट पाकिस्तानबाबतची भूमिका असो, बाळासाहेबांचे तोफ गोळे कायम कोसळत राहिले. बाबारीचा ढाचा पाडण्यात आमचा हात नव्हता, असं म्हणत बचावात्मक भूमिका घेणाऱ्यांच्या काळात बाबरी पाडण्यात आमच्या शिवसैनिकांचा हात नाही तर पायसुद्धा होता, अशी थेट भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते. हिंदुत्वाची रखरखती मशाल त्यांच्या व्यक्तिमत्वात होती. बाळासाहेब ठाकरेंनी अखेरपर्यंत जे स्वप्न पाहिलं ते कालचं पूर्ण झाल्याचं चित्र देशात पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू राम चंद्राचं अयोध्येत भव्य असं मंदिर उभं राहिलय. त्यामध्ये प्रभू राम विराजमानही झाले. अशातच बाळासाहेबांच्या जयंतीने पुन्हा या गोष्टींची आठवण करून दिलीय.
विचारांचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं :बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 साली झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते तसंच, पत्रकारदेखील होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या आईचे नाव रमाबाई होते. एकूण नऊ भावंडांपैकी बाळासाहेब ठाकरे हे सर्वात मोठे होते. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रस्थानी होते. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं बाळकडू बाळासाहेबांना घरातूनच मिळाले.
मार्मिक हे साप्ताहिक सुरु केलं :पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रातून केली. या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी पहिल्यांदा नोकरी मिळवली. त्यांनी काढलेली व्यंगचित्र इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध होत होते. 13 जून 1948 ला बाळासाहेब ठाकरे यांचं लग्न मीनाताई ठाकरे यांच्याशी झालं. नोकरीमध्ये त्यांना रस वाटत नव्हता म्हणून 1960 साली त्यांनी आपलं स्वतःचं मार्मिक हे साप्ताहिक सुरू केलं. मार्मिकच्या माध्यमातून महाराष्ट्रातले आणि मराठी माणसाचे प्रश्न त्यांनी समोर आणण्यास सुरुवात केली.