नाशिक :नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेच्या चौकशीनंतर रुग्णालयातील तीन मुख्य डॉक्टरांसह चार शिकाऊ डॉक्टर आणि एका परिचारिकेचं निलंबन करण्यात आलय. जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गरोदर महिलेला मुलगा झाला होता. परंतु, डिस्चार्ज देत असताना हातात मुलगी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी समिती स्थापन करुन चौकशी केल्यानंतर रुग्णालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? :प्रीती पवार नावाची महिला रविवारी (13 ऑक्टोबर) रात्री बाळंतपणाला रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी या महिलेनं मुलाला जन्म दिला असं सांगण्यात आलं. तसंच रुग्णालयाच्या रजिस्टरमध्येही मुलाच्या जन्माची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (15 ऑक्टोबर) रात्री या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांच्या हाती मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळं संबंधित महिला आणि कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी मुलगी घेण्यास नकार दिला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं.
चौकशीनंतर कारवाई : या संदर्भात प्रहार संघटनेनं पुढाकार घेत नातेवाईकांना पाठबळ देत थेट सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांना घेराव घालत विचारपूस केली. त्यानंतर याप्रकरणी एक कमिटी स्थापन करत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी नातेवाईकांना दिलं. यानंतर कागदपत्रं आणि सीसीटीव्हीच्या आधारे चौकशी केल्यानंतर तीन मुख्य डॉक्टरांसह चार शिकाऊ डॉक्टर आणि एका परिचारिकेचं निलंबन करण्यात आलय.
चौकशी अहवालात काय म्हटलंय? : महिलेनं मुलीला जन्म दिला होता. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी नातेवाईकांना मुलगा झाल्याचं सांगत त्याची नोंद सरकारी रजिस्टरमध्ये केली होती. याबाबत चौकशीदरम्यान महिलेचे आधीचे सोनोग्राफी रिपोर्ट आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकेची चूक आढळल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळं चर्चेत असतं. यापूर्वी या रुग्णालयात एका जिवंत बाळाला मृत घोषित करण्यात आल्याची घटना घडली होती. तसंच मृत व्यक्तीचं सोनं चोरी झाल्याचीही घटना या रुग्णालयात घडली होती. त्यामुळं अशा अनेक कारणांवरुन हे रुग्णालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलय.
हेही वाचा -
- जन्माला आला मुलगा, मात्र डिस्चार्जवेळी हातात सोपवली मुलगी; नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ