महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तानमधील स्मशानभूमीत होणार दफन विधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तानमध्ये आज दफन विधी होणार आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 1 hours ago

बाबा सिद्दीकी
Baba Siddique death new (Source- ETV Bharat)

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा झियाउद्दीन सिद्दीकी यांचे पार्थिव कूपर रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. बाबा सिद्दीकी यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत.

बाबा सिद्दीकी यांच्या समर्थकांनी कूपर रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता कूपर रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Live Updates-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याकरिता व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. बाबा सिद्दीकी यांनी 2004-2008 दरम्यान महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून तसेच म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

लवकर कडक कारवाई करावी-बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणावर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले "हे खेदजनक आहे. गेल्या 10 दिवसांत एका तालुकाप्रमुख आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्याची हत्या झाली आहे. पोलिसांना या धमक्यांची माहिती होती. त्यांना वाय सुरक्षा पुरवण्यात आली होती. पोलीस हे केवळ सुरक्षा देण्यापुरते मर्यादित नाहीत. धमक्या कुठून येत आहेत? या धमक्या देणारे कोण आहेत? याचा तपास करायचा आहे. पोलिसांनी लवकरात लवकर कडक कारवाई करावी."

जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. यामागील कटकारस्थानांना सरकारने कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे-काँग्रेसचे खासदार, मनीष तिवारी

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले, " मुंबईत सार्वजनिक ठिकाणी असे गुंड येऊन गोळीबार करत आहेत. सत्ताधारी पक्षाच्याच्या नेत्याला गोळ्या झाडून मारले जाते. मुंबईत सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई पुन्हा गुन्हेगारीचे केंद्र बनणार आहे का? महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेने चालला आहे का? ही भीती आता भेडसावत आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे.

महाराष्ट्रात नुसती लूट- बाबा सिद्दीक हत्या प्रकरणावर शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, "बाबा सिद्दीकी हे सर्व पक्षांमध्ये आदरणीय नेते होते महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. 15 दिवसांपूर्वी त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जगभर ओळखले जाणारे मुंबई आणि मुंबई पोलिसांना काय झाले. गुप्तचर यंत्रणा कशी अपयशी झाली? महाराष्ट्रात नुसती लूट आहे. कायदा आणि सुव्यवस्था नाही."

सरकारला सावध होण्याची गरज-चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी म्हटले, "बाबा सिद्दिकी हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्यासोबत अशी घटना घडेल, असे मला कधीच वाटले नव्हते. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो की, ही हत्या सरकारला सुरक्षेबाबत सावध होण्याचे संकेत आहेत. जर बाबा सिद्दीकींसोबत ही घटना घडू शकते. तर सर्वसामान्यांचे काय होणार आहे? "

  • आरोपीला अटक होईल-वकील उज्ज्वल निकम म्हणाले, "मुंबईत रात्री घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून कोणत्याही राजकीय नेत्याची हत्या झाली नव्हती. ही हत्या का झाली आणि कोणी केली हा मुख्य प्रश्न आहे? मला खात्री आहे की, मुंबई गुन्हे शाखा आरोपीला नक्कीच शोधून काढेल."

दिल्ली पोलीस मुंबईत होणार दाखल-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस विशेष तपास पथक मुंबईत पाठविणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे एका संशयित गँगस्टारचा हात असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. या गँगस्टरकडून मुंबईत वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं दिल्ली पोलिसांमधील विशेष सूत्रानं सांगितलं.

समर्थकांची कूपर रुग्णालयाबाहेर गर्दी-वांद्रे पूर्व येथील निर्मल नगरजवळ शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर किमान तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. बाबा सिद्दीकी हे कार्यालयात पोहोचताच हल्लेखोर धावत आले. त्यांनी सिद्दीकी यांच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. ही घटना शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. सुरुवातीला फटाक्यांच्या आवाजामुळे स्थानिकांना गोळीबार झाल्याचं लक्षात आले नव्हते. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांना वांद्रे पश्चिम येथील लीलावती रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे नेते आणि त्यांचे समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली.

आज रात्री होणार दफन विधी-राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आज रात्री साडेआठ वाजता मरीन लाईन येथील बडा कब्रस्तान स्मशानभूमीत दफन विधी होणार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर बाबा सिद्दिकी यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतिम अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर साधारण रात्री सात वाजता बाबा सिद्दिकी यांचे पार्थिव मरीन ड्राईव्ह कब्रस्तानच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हत्येमागील कारण अस्पष्ट-अल्पसंख्याक समाजातील महत्त्वाचे नेते असलेल्या सिद्दीकी यांच्या हत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. व्यावसायिक वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा संशय आहे. बाबा सिद्दीकी हे माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि त्यांची मुलगी प्रिया दत्त यांचे जवळचे सहकारी होते. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा मुलगा झीशानही काँग्रेस सोडू शकतो, अशी चर्चा होती.

हेही वाचा-

  1. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती, पोलिसांकडून तत्काळ सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
  2. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारनं जबाबदारी...”
  3. घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय ते राष्ट्रवादीमधील वजनदार नेते; जाणून घ्या, बाबा सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास
Last Updated : 1 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details