शिर्डी : सध्याच्या धावपळीच्या जगात आपला वेळ वाचावा, यासाठी लोक कोणत्याही वस्तू आता ऑनलाईन पद्धतीनं मागवतात. मग ती कपड्यांची शॉपिंग असो किंवा फूड डिलिव्हरी. त्यामुळं ऑनलाईनचं प्रमाण सध्या जास्त वाढलं आहे. विविध ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपवरून ऑनलाईन फूड मागवलं जातं. हेच बघून आता ताजं दळलेलं पीठ घरपोच नेऊन देण्याची सुविधा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील एका गिरणीवाल्यानं सुरू केली आहे. इतकंच नाही तर यासाठी त्यानं एक अॅप देखील तयार केलंय.
अशी सुचली संकल्पना : राहाता शहरातील दत्तात्रय बनकर यांचं बी टेक झालंय. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी 10 वर्षे नोकरी केली. मात्र, नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं. त्यामुळं धाडस करत त्यांनी नोकरी सोडली आणि ते पुन्हा गावाकडं परतले. परंतु, गावात आल्यावर नेमकं काय करावं, हे त्यांना सुचत नव्हतं. त्यामुळं त्यांनी आपल्या वडिलांची पिठाची गिरणी चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामध्येही आपल्या शिक्षणाचा फायदा व्हावा, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं त्यांनी ताजं दळलेलं पीठ घरपोच मिळावं यासाठी एक अॅप तयार करण्याचं ठरवलं. यानुसार त्यांनी 'गिरणीवाले' या नावानं अॅप विकसित केलं. त्याद्वारे ग्राहकांना विविध प्रकारचे धान्य आणि त्याचं ताजं पीठ घरपोच पुरवण्याची आगळी वेगळी सेवा सुरू करण्यात आली. त्यांच्या या प्रयत्नास ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळतय.
आठ दिवसात दीडशेहून अधिक ग्राहक : अॅप सुरू केल्याच्या पहिल्या आठ दिवसांतच दीडशेहून अधिक ग्राहकांनी या अॅपचा वापर सुरू केला. या अॅपद्वारे ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि विविध प्रकारची कडधान्यं तसंच त्यांचे ताजं पीठ खरेदी करता येऊ शकते. शिवाय दळण जाड हवंय की बारीक हा प्रकार निवडण्याची देखील सुविधा यात उपलब्ध आहे. तर आजच्या डिजिटल युगात पारंपरिक व्यवसायही ऑनलाईन होत आहेत. त्यामुळं बदलता काळ पाहता ही कल्पना सुचल्याचं, दत्तात्रय बनकर यांनी सांगितलं. तसंच सध्या ही सुविधा केवळ राहाता शहरात सुरू असून पुढं जाऊन इतर ठिकाणीही ऑनलाईन डिलिव्हरी करण्याचा विचार करु, असंही बनकर म्हणाले.
हेही वाचा -