मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असलेल्या आमिर खानच्या चित्रपटाची प्रेक्षक खूप काळापासून आतुरतेने वाट पाहत आहेत. तो कमी चित्रपटांमध्ये दिसत असला तरी प्रेक्षकांना त्याचं काम खूप पसंत पडतं. आमिर खान त्याच्या चित्रपटांसाठी कथा निवडण्याच्या, सामाजिक मुद्दे मांडण्याच्या आणि व्यक्तिरेखा रंगवण्याच्या बाबतीत खूपच चोखंदळ असतो. त्यामुळेच त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळतं. परंतु, २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला त्याचा शेवटचा चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' फार चालला नाही, त्यानंतर आमिर खान कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. गेल्या काही काळापासून तो 'महाभारत' या त्याच्या ड्रीम प्रोजेक्टमुळं चर्चेत आहे आणि चाहते त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. आता त्यानं त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलंय आणि चित्रपटाविषयी अपडेटही दिली आहे.
'महाभारत'बद्दल काय म्हणाला आमिर खान? - आपल्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'महाभारत'बद्दल एका मुलाखतीत म्हणाला की, "महाभारत हे माझं स्वप्न आहे, म्हणून कदाचित आता मी त्याबद्दल विचार करू शकेन. बघूया की त्यात माझी काही भूमिका आहे की नाही. एक अभिनेता म्हणून मला एका वेळी फक्त एकच चित्रपट करायचा आहे, पण एक निर्माता म्हणून मी अधिक चित्रपट करू शकतो. पुढच्या महिन्यात मी ६० वर्षांचा होईन पण मी आणखी १०-१५ वर्षे काम करेन आणि नवीन प्रतिभेला संधी देईन." असं म्हणत त्यानं 'महाभारत'साठी उत्साह निर्माण केला आहे. आता या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल अधिक तपशील तो कधी देणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आमिर खानला किशोरांसाठी बनवयाचा आहे कंटेंट - त्याच मुलाखतीत आमिरनं सांगितलं की त्याला लहान मुलांशी संबंधित कंटेंट खूप आवडतो. तो म्हणाला की, "मला वाटतं की भारतात मुलांशी संबंधित कमी कंटेंट बनवला जाता. यातही बराचसा कंटेंट परदेशी असतो आणि त्याचं फक्त भारतातल्या भाषेत डबिंग केलं जातं. म्हणूनच मला इथला मुंलांसाठी काही तरी ओरिजनल बनवायचं आहे. "
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आमिर खान २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंग चड्ढा' मध्ये अखेरचा अभिनय करताना दिसला होता. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच आमिरनं या चित्रपटाची निर्मितीही केली होती. हा चित्रपट ऑस्कर विजेता हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक होता. पण तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. अलीकडेच त्यानं त्याची पूर्व पत्नी किरण राव हिच्याबरोबर 'लापता लेडिज' या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात काम करण्याची इच्छा असूनही किरण रावने त्याला संधी दिली नाही. आमिरला यात साकारायची असलेली व्यक्तिरेखा रवी किशनने साकारली. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुकास्पद प्रतिसाद दिला. आमिर खान आगामी काळात 'लाहोर १९४७' या चित्रपटाची निर्मिती करत असून यामध्ये सनी देओल मुख्य भूमिका साकारत आहे आणि याचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत.
हेही वाचा -