अहमदनगर Independence Day 2024 : कवी प्रदीप यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेलं, रामचंद्र चितळकर म्हणजेच सी. रामचंद्र यांच्या कल्पक संगीतसाजानं नटलेलं आणि 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्या अलौकिक स्वरांनी नटलेलं 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं आपल्या देशाच्या जिगरबाज जवानांच्या त्यागाला, बलिदानाला दिलेली सुरेल मानवंदना आहे. आज 'ऐ मेरे वतन के लोगों' चे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायिका लौकिकार्थाने आपल्यात नाहीत. याच गाण्याच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या संगीत दिग्दर्शक रामचंद्र चितळकर यांच्या जन्मगावाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सी रामचंद्र यांचं जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातलं पुणतांबा. आज हे गाव, तिथलं रामचंद्र चितळकर यांचं घर, त्यांचे वंशज आदींची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न क्वचितच कुणी केला असेल. ईटीव्ही भारत हा प्रयत्न करणार आहे.
सी. रामचंद्र यांचं गाव दुर्लक्षित :काही गाणी इतिहास घडवतात. किंबहुना इतिहास घडवण्यासाठीच त्यांची रचना होते. 'ऐ मेरे वतन के लोगो' हे असंच इतिहास घडवणारं गीत. हे गाणं ऐकलं आणि ज्याची गात्रं शहारली नाहीत, असा दर्दी संगीतरसिक नाही. भारतीयांच्या तीन पिढ्यांवर या गाण्याचं गारुड कायम आहे. 'ऐ मेरे वतन के लोगो' ऐकताना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले होते, हे सर्वश्रुत आहे. हे गीत लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांच्या शब्दांना उत्तम न्याय देण्याचं काम संगीत दिग्दर्शक रामचंद्र चितळकर म्हणजेच सी रामचंद्र आणि संगीतरसिकांच्या लाडक्या 'अण्णां'नी केलं. हे देशभक्तिपर गाणं तमाम भारतीयांच्या लक्षात आहे. पण गाण्याच्या संगीत दिग्दर्शकाविषयी, त्यांच्या जन्मगावाविषयी जाणून घेणं दर्दी म्हणवणाऱ्या संगीतरसिकांनाही गरजेचं वाटत नाही. सी. रामचंद्र यांचं अहमदनगर जिल्ह्यातील जन्मगाव पुणातांबा आजही दुर्लक्षित असण्याचं हेच कारण असावं.
चित्रपटसृष्टीतील अण्णा :अलबेला, आजाद, बहुरानी, देवता, इन्सानियत, झमेला, नवरंग, निराला, पतंगा, पैगाम, शहनाईसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांमधून विविधांगी गाणी देणाऱ्या सी रामचंद्र यांच्या लखलखत्या सुवर्ण कोंदणातला 'ऐ मेरे वतन के लोगों' हा तेजस्वी हिरा आहे. जन्मगाव पुणतांब्यातच रामचंद्र नरहरी चितळकर नावाच्या किशोरवयीन मुलाने चित्रपटसृष्टीत नायक बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मुंबईची वाट धरली. मुंबईत येण्याआधी या युवकाच्या वडिलांनी आपल्या मुलाला संगीतसाधनेसाठी नागपूरला धाडलं होतं. तिथेच संगीत विषयाची बिजं या युवकाच्या मेंदूत पेरली गेली आणि रामचंद्र चितळकर या युवकाचा सी रामचंद्र म्हणून नावारुपाला येण्याचा प्रवास सुरु झाला. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या रुपेरी दुनियेत रामचंद्र चितळकर नावाचा तरुण उपरा ठरला असता. म्हणून त्यानं नव्या नावानं प्रवास सुरु केला. सी रामचंद्र! रामचंद्र चितळकरांचा सी रामचंद्र होण्यापर्यंतचा आणि नंतरचाही सर्व यशाचा आलेख पुणतांब्यानं पाहिला आहे.