नागपूर Bhau Kane Passed Away : दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध ॲथलेटिक्स प्रशिक्षक संजय उर्फ भाऊ काणे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
क्रीडाविश्वात हळहळ : भाऊ काणे यांनी नागपूर शहरातून तब्बल 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. भाऊ काणे यांनी आपलं जीवन खेळासाठी समर्पित केलं होतं. 1973 मध्ये एमकॉमचे सुवर्णपदक विजेते भाऊ काणे यांनी 2009 मध्ये एसबीआयकडून स्वेच्छा व्हीआरएस घेतली आणि खेळाडू तयार करणं आणि सुधारणं यावर लक्ष केंद्रित केलं. ते नव महाराष्ट्र क्रीडा मंडळचे संस्थापक होते. भाऊ काणे यांच्या अचानक निधनांन क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.
व्रतस्थ ऋषी आपण गमावला :भाऊ काणे यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंना घडवणारे हाडाचे प्रशिक्षक भाऊ काणे यांच्या निधनानं क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारा व्रतस्थ ऋषी आपण गमावला आहे. भाऊंनी आपल्या कौशल्य, जिद्द आणि परिश्रमानं नागपूरमध्ये 11 हून जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. शहरात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी भाऊ काणेंनी दिलेलं योगदान नागपूरकर कधीही विसरू शकणार नाहीत. भाऊ काणेंना माझी विनम्र श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या परिजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
आधुनिक द्रोणाचार्यास भावपूर्ण श्रद्धांजली : "दादोजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित नागपूर शहरातील ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक संजय उपाख्य भाऊ काणे यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भाऊंनी नागपूर शहरात अनेक खेळाडू घडवले. आज त्यांनी घडवलेले खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने नागपूरच्या क्रीडा क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. भाऊंसारख्या आधुनिक द्रोणाचार्यास भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे", असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाऊ काणे यांना वाहिली आहे.
हेही वाचा -
- मनोहर जोशींच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
- आमिन सयानींच्या निधनानंतर आवाजाची जादु अनुभवलेल्या रसिकांवर दुःखाची छाया
- बबिता फोगटने 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या प्रार्थना सभेला हजेरी लावली; केला शोक व्यक्त