पुणेAshadhi Wari 2024 : : दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर पुढे जात आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवेघाटाची अवघड चढण पार करत सासवड येथे मुक्कामी असणार आहे. लाखो वारकरी आज माऊलींसोबत दिवेघाट सर करणार आहेत. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे पुढे जाऊन लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहेत.
पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी होती. तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी होती. पुणे शहरात पालखी मुक्कामी असल्याने मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पुण्यात दाखल झाले होते. या अनुषंगाने वारकऱ्यांच्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्याच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पावसाच्या अनुषंगानेदेखील सभा मंडप तसेच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.
- विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर... कपाळी गंध- टिळा, हाती भगवा पताका घेवून वारकऱ्यांनी सिव्हिल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट असा मेट्रो प्रवास केला. सरकत्या जिन्यावरून वर जात, तिकीट घेतल्यानंतर आपोआप उघडणारा दरवाजा पाहून अप्रूप वाटणाऱ्या वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला.
मानाचा चौथा महागणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुणे तर्फे वारकऱ्यांसाठी सिविल कोर्ट ते पिंपरी व परत पिंपरी ते सिविल कोर्ट अशी मेट्रोची सफर आयोजित केली होती. यावेळी तब्बल 100 हून अधिक वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला. पुण्याची सार्वजनिक वाहतूक सक्षम आहे. पुणेकरांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी वारकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे किट, गुडदाणीची पॅकेट, बिस्किटाचे पुडे देण्यात आले. वारकरी दरवर्षी वारी मधून सामाजिक संदेश देत असतात.