पुणेAshadhi wari 2024 : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पुण्यात रविवारी आगमन झालय. आज पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या मुक्कामाला आहेत. शहराच्या आजूबाजूला पुणेकर नागरिक तसंच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. असं असलं तरी पुण्यातील साखळीपीर तालीम येथे गेल्या 25 वर्षापासून अब्दुल रज्जाक (चाचा) हे वारकऱ्यांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे अब्दुल रज्जाक (चाचा) हे हैदराबाद येथे राहायला असून ते पालखीच्या वेळेस पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. एवढंच नव्हे तर हे चाचा स्वतःहा तेल बनवतात आणि पुण्यात येऊन वारकऱ्यांची मालिश करतात.
पंचवीस वर्षांपासून करतात सेवा : पुण्यात अब्दुल रज्जाक हे वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळत आहे. अब्दुल रज्जाक हे जरी मूळचे हैदराबाद येथील असले तरी ते पुण्यात मुलींच्या येथे काही वर्ष राहायला होते. जडीबुटी पासून तेल तयार करून विविध आजारांवर औषधोपचार करण्याचा रज्जाक चाचा यांचा व्यवसाय आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून रज्जाक चाचा हे पुण्यात वारकऱ्यांची सेवा करत आहेत. 8 ते 10 वर्षापासून ते त्यांच्या मूळ गावी हैदराबाद येथील मलकपेठ येथे राहायला गेले आहेत. मात्र, असं असलं तरी ते पुण्यात पालखी आल्यावर पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात.