पुणेPune hit and run case :पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 मे रोजी भरधाव पोर्श कारनं दुचाकीला धडक दिल्यानं दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही कार चालवत होता. त्याच रात्री ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांत या मुलाची जामिनावर सुटका करण्यात झाली होती. त्यामुळं या घटनेबाबत राज्यासह देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक रॅप गाणं व्हायरल झालंय. या गाण्यातील मुलगा अल्पवयीन आरोपी असून त्याच्या कृत्याचं समर्थन करत गाणं गाताना दिसत आहे. त्यामुळं या घटनेबाबत अधिकच संताप व्यक्त होत होता. आता हे रॅप गाणं गाणाऱ्या तरुणाविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय प्रकरण आहे? :पोर्श कारच्या अपघातानंतर हे रॅप गाणं व्हायरल झालं. हे गाणे गाणारा मुलगा एक अल्पवयीन आरोपी असून तो पोर्श कारच्या अपघाताचं समर्थन करतो. या गाण्यामुळं लोकांमध्ये आणखीच संताप निर्माण झाला. अखेर अल्पवयीन आरोपीच्या आईला हा आपला मुलगा नसल्याचं सांगावं लागलं. गुरुवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली असता त्यांनीही हा खोटा व्हिडिओ असल्याचं नमूद केलं असून अल्पवयीन आरोपीच्या नावानं व्हिडिओ बनवणाऱ्या मुलाचा शोध सुरू होता. त्यावर आता व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणानं एक व्हिडिओ शेअर करत 'मी' मध्यमवर्गीय असल्यानं पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केलाय.
याबाबत व्हिडिओ बनवणारा आर्यन नीखरा म्हणाला की, 'मी फक्त कंटेंट क्रियेटर आहे. पुणे पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांनी गुन्हा मागे घ्यावा. मूळ केस पासून सगळ्यांचं लक्ष वळवण्यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मी कोणाला शिवीगाळ केली नाही. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या', असं यावेळी आर्यननं सांगितलं.