मुंबई Antilia Land Deal Illegal : राज्यात वक्फ बोर्डाच्या मालकीच्या शेकडो एकर जमिनी आहेत. मुस्लिम समाजातील लोकांच्या कल्याणासाठी, विकासासाठी या जमीनीचा वापर करावा, असे निर्देश आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनी विकता येत, नाहीत किंवा त्या हस्तांतरित करता येत नाहीत. एकदा ही जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचं जाहीर झाल्यानंतर त्यावर अन्य कोणत्याही उपक्रम करता येत नाहीत. मात्र, असं असतानाही मुंबईतील अत्यंत मोक्याची वक्फ बोर्डाच्या मालकीची जागा अनाथ मुलांसाठी राखीव होती. ही जागा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना अँटिलिया इमारत बांधण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप माजी अल्पसंख्याक मंत्री अनिस अहमद यांनी केला. सुमारे 500 कोटी रुपयांची ही जमीन केवळ 21 कोटी रुपयांना तत्कालीन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष दिवंगत एम. ए. अजिज यांच्या मुलानं ही जमीन मुकेश अंबानी यांना विकल्याचं सांगितलं जात आहे.
2017 मध्ये न्यायालयात सादर केला अहवाल : वक्फ बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन ताशिलदार यांनी 2017 मध्ये याबाबत अहवाल सरकारला सादर केला होता. ज्यामध्ये ही जमीन बोर्डाच्या मालकीची असल्याचं म्हटलं होतं. याबाबतच्या अहवालाची प्रत मुंबई उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली होती. या संदर्भात आपण अंबानी यांना नोटीस बजावल्याचंही अनिस अहमद यांनी म्हटलं आहे .
अहवाल बदलल्याचा आरोप :2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अँटिलिया इमारतीची जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचं अहवालात नमूद केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवा अहवाल तयार करण्यात आला. त्यातून ही जमीन वगळण्यात आली. त्यामुळं अंबानी यांना मोठा दिलासा शिंदे सरकार देत असल्याचा आरोपही अनिस अहमद यांनी केला आहे. मात्र, हा अहवाल सरकार का सार्वजनिक करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जमीन वक्फ बोर्डाचीच :अंबानी यांच्या अँटेलिया इमारतीची जमीन वक्फ बोर्डाची असल्याचं आम्ही आधीच सांगितलं असल्याचं महायुती सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी कबुल केलं आहे. मात्र, आता त्या प्रकऱणात काय झालं आहे, ते मला माहित नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.