अमरावती Student Will Learn German Language : उच्च माध्यमिक शिक्षणाचं व्यावसायीकरण या योजनेचा विस्तार करुन युरोपच्या जर्मन राष्ट्रात बाडेन वूटेनबर्ग या राज्यासोबत महाराष्ट्र शासनानं सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत महाराष्ट्रातील हजारो तरुणांना जर्मनीत रोजगार मिळणार असून यासाठी त्यांना जर्मन भाषा देखील शिकावी लागणार आहे. जर्मन भाषा राज्यात रुळावी, विकसित व्हावी या उद्देशानं राज्य शासनाच्या वतीनं आता विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या वाढोणा या अवघ्या तीनशे ते साडेतीनशे लोकवस्तीच्या गावात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना देखील जर्मन भाषा शिकण्याचे वेध लागलेत. या शाळेच्या शिक्षिका जर्मन भाषेचं प्रशिक्षण घेणार असल्यानं दिवाळीनंतर आपल्याला देखील जर्मन भाषेचं ज्ञान मिळेल, याची उत्सुकता विद्यार्थ्यांना आहे. या बाबत 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिकणार जर्मन (ETV Bharat Reporter) चिमुकले दोन वर्षांपासून शिकत आहेत जपानी भाषा : वाढोणा इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गत दोन वर्षांपासून शाळेतील शिक्षिका सुनिता लहाने ढोक या प्राथमिक स्तरावरील जपानी भाषेचं ज्ञान देत आहेत. जपानी बाराखडी देखील हे चिमुकले गिरवायला लागले असून प्राथमिक स्तरावरील जपानी भाषा देखील हे विद्यार्थी बोलायला शिकलेत. शालेय अभ्यासक्रमात उपक्रम नसला, तरी या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी जपानी भाषेसाठी स्वतंत्र वहीमध्ये जपानी लिपी आणि शब्द गिरवत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार परकीय भाषा शिकण्यास प्राधान्य देण्यात आलं. त्या अंतर्गतच आम्ही शाळेत जपानी भाषा शिकवण्यास सुरुवात केली. जपानी भाषा हे विद्यार्थी शिकू शकतात. त्यामुळं जर्मन भाषा शिकणं देखील या विद्यार्थ्यांना सहज जमेल, असा विश्वास सुनिता लहाने ढोक यांनी "ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
शिक्षिका घेणार जर्मन भाषेचं प्रशिक्षण : महाराष्ट्रातून जर्मन देशात कुशल कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध असून जर्मनीत जाण्यासाठी मराठी तरुणांना जर्मनी भाषेचं ज्ञान असावं, यासाठी शासनाच्या वतीनं हजारो तरुणांना जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. या तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी शासनाच्या वतीनं राज्यातील शिक्षकांना खास प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर शिक्षकांचं हे प्रशिक्षण होणार असून वाढोणा शाळेतील सुनिता लहाने ढोक या शिक्षिकेनं या प्रशिक्षणासाठी अर्ज केला आहे. येत्या काही दिवसात त्यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचं जर्मन भाषा प्रशिक्षण सुरू होईल. हे शिक्षक प्रशिक्षित झाल्यावर जिल्हा स्तरावरील विविध क्षेत्रात कुशल असणाऱ्या आणि ज्यांची जर्मनीला जायची तयारी आहे, अशा तरुणांना ते जर्मन भाषा शिकवणार आहेत.
असे असणार प्रशिक्षण : महाराष्ट्र शासनानं जर्मनीतील बाडेन वूटनबर्ग या राज्यासोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रातील परिचारिका, वैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा सहायक, रेडिओलॉजी सहायक, दंतचिकित्सा सहायक, आजारी आणि वृद्ध व्यक्तींचा काळजीवाहक, सेवक, वेटर, स्वागत कक्ष संचालक सफाई कामगार, गोदाम व्यवस्थापक, विक्री सहायक, वीजतंत्री, अक्षय उर्जेसाठीचा वीजतंत्री, औष्णिक वीजतंत्री, रंगारी, सुतार, गवंडीकाम, नळ जोडणी, हलक्या आणि जड वाहनांचा तंत्रज्ञ, वाहनचालक, सुरक्षा रक्षक अशा कामगारांना जर्मनीत रोजगार मिळणार आहे. या तरुणांना जर्मन भाषा यावी, यासाठी जर्मन भाषेचं प्रशिक्षण देणारी जर्मनीची प्रसिद्ध गोएथे संस्था प्रशिक्षण साहित्य ऑनलाइन ग्रंथालय उपलब्ध करून देणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेअंतर्गत प्रशिक्षण घेणारे शिक्षक या कुशल कामगारांना जर्मन भाषा शिकवणार आहेत. गोएथे संस्था प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र बहाल करेल. या संस्थेनं दिलेलं प्रमाणपत्र जर्मन देशात ग्राह्य मानल्या जातं, अशी माहिती देखील सुनिता लहाने ढोक यांनी दिली.
शाळकरी विद्यार्थ्यांनाही लागणार जर्मन भाषेची गोडी :महाराष्ट्रातील कुशल तरुण कामगारांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी शासनाच्या वतीनं कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. आता जर्मन भाषेचं प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या शाळेतील चिमुकल्यांना देखील जर्मन भाषेचं ज्ञान मिळेल. वाढोणा या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दिवाळीनंतर आपल्या शिक्षिका आपल्याला जर्मन भाषा शिकवतील, याची उत्सुकता लागली आहे. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत केवळ वीस विद्यार्थी आहेत. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीचीच आहे. असं असलं तरी सुनिता लहाने ढोक यांनी शाळेमध्ये या चिमुकल्यांसाठी आपुलकीचं वातावरण निर्माण केलं. अगदी हसत खेळत हे विद्यार्थी शाळेत शिकतात. इयत्ता पहिली दुसरीतल्या विद्यार्थ्यांना 30 पर्यंत पाढे पाठ आहेत. इंग्रजीसह जपानी भाषेचं प्राथमिक ज्ञान या चिमुकल्यांना असून दिवाळीनंतर आपल्या शिक्षिका जर्मन भाषा शिकवतील, याची उत्सुकता देखील त्यांना लागली आहे. या चिमुकल्यांना जर्मन भाषेची गोडी देखील लागेल, असा विश्वास सुनिता लहाने ढोक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार - Amravati News
- चिमुकल्यांनी राख्या तयार करून बाजारात आणल्या विकायला; पळसखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम - Raksha Bandhan 2024
- विद्यार्थी झाले सेलफोन मुक्त; शिक्षकाच्या प्रयत्नांना यश - Amravati News