पुणे Amit Shah on Ajmal Kasab Biryani -लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून फेक नॅरिटव्ह केल्याचा भाजपाकडून सातत्यानं आरोप करण्यात येतो. हे फेक नॅरेटिव्ह दूर करण्याकरिता आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता पुण्यात दोन दिवसांचं अधिवेशन घेतलं. या अधिवेशनाचा रविवारी समारोप करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र, या टीकेत त्यांनी कसाबला बिर्याणी देण्याचा उल्लेख केल्यानं हा विषय पुन्हा चर्चेत आला.
भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह म्हणाले, "उद्धव ठाकरे हे कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत सोबत गेले. याकुब मेमनची सुटका करण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. या क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत."
मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला यंदा 26 नोव्हेंबरला 16 वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, अद्यापही यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतात.
- मुंबईवरील हल्ला कसा घडला होता?
पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गानं घुसून 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला केला. या हल्ल्यात 166 नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. रात्री साडेबारा वाजता मुंबई नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत दहतवाद्यांची कार अडविली. यावेळी दहशतवाद्यांची पोलिसांच्या सूचनेनुसार गाडी न थांबविता थेट गोळीबार केला. यावेळी पोलीस कर्मचारी भास्कर कदम यांनी सर्व्हिस रिव्हॉलवरमधून गोळीबार करत दहशतवादी अबू इस्माईलला जखमी केलं. कारमध्ये बसलेल्या कसाबला पकडण्यासाठी जात असताना त्याने एके-47 मधून गोळीबार केला. यावेळी तुकाराम ओंबळे यांनी स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलत कसाबला अटक केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात विदेशी नागरिकांसह 166 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबचा सहभाग आढळला. कसाब वगळता सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार केलं. कसाबला फाशी देण्यात न आल्यानं जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. अखेर चार वर्षांनी अजमल अमीर कसाबला 21 नोव्हेंबर 2012 ला फाशी देण्यात आली.
- तत्कालीन माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी पुस्तकात काय म्हटलं?
माजी आयएपीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी 'मॅडम कमीशनर' या पुस्तकात कसाबबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात दहशतवादी कसाबला पुणे येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. त्याकाळात नेमकं काय घडलं, याबाबत मीरा बोरवणकर यांनी 'मॅडम कमीशनर' पुस्तकात माहिती दिली. कसाबला बिर्याणी देण्यात आल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. त्यावर पुस्तकात म्हटले की, "तुरुंगात आणल्यानंतर कसाब प्रचंड रागात होता. त्याच्याशी बोलल्यानंतर त्यानं अनेकदा मौन बाळगलं. तर कधी हसून गप्प राहणं पसंत केलं. डॉक्टरांकडून त्याच्या आरोग्याची आणि डायटची खास काळजी घेण्यात येत होती. मात्र, त्याला कधीही बिर्याणीसारखी खास डिश देण्यात आली नाही. कसाब व्यायाम करून स्वत:ला बिझी ठेवायचा." कसाबला फाशी देण्याकरिता कशी तयारी करण्यात आली, यावरदेखील पुस्तकात माहिती देण्यात आली. त्यांनी म्हटलं, "तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सर्किट हाऊसमध्ये बोलावून फाशीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली फाशी देण्याबाबत संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. तीस वर्षानंतर राज्यात पहिल्यांदाच फाशी देण्यात येत असल्यानं सतर्कता बाळगण्यात आली होती."
भारतीय जनता पक्ष आता निवडणुकीतील पराभवाला घाबरला आहे. महाराष्ट्रातील जनतेनं भाजपाला नाकारले आहे. त्यामुळे भाजपा आता महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यावर फेक नॅरेटिव्हचा खोटा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते आता कसाबला न दिलेल्या बिर्याणीचा उल्लेख करुन फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा स्वत: प्रयत्न करत आहेत. मात्र राज्यातील जनता शहाणी असल्यानं त्यांची दिशाभूल करणे भाजपाला शक्य होणार नाही - क्लाईड क्रास्ट्रो, राष्ट्रीय प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार
- कसाबनं बिर्याणी मागितल्याचा निकम यांनी का केला दावा -कसाबला फाशी दिल्यानंतर काही वर्षांनी विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केला. "कसाबनं कधी बिर्याणी मागितली नव्हती. मात्र, भावनात्मक लाट थांबविण्यासाठी तसा दावा केला होता," असं निकम यांनी म्हटलं. हे विधान त्यांनी 2015 मध्ये जयपूरमधील दहशतवाद विरोधी आंतरराष्ट्रीय परिषेदत केलं. उज्जवल निकम त्यावेळी म्हणाले की, "कसाबनं कधी बिर्याणी मागितली नव्हती. तसंच सरकारकडून कधीही त्याला बिर्याणी देण्यात आली नाही. दहशतवादी कसाबबाबत भावनिक सहानुभूती थांबविण्यासाठी तसं वक्तव्य केलं होतं." यावेळी त्यांनी सुनावणीच्या खटल्यातील माहिती दिली. ते म्हणाले, "रक्षाबंधन दिवशी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याला बहिणीची आठवण येत असल्याचं म्हटलं. तसंच तो दहशतवादी असल्याबाबत संशय व्यक्त केला. त्यामुळे कसाबकडून मटन बिर्याणीची मागणी होत असल्याचं वक्तव्य केलं होतं." दुसरीकडं एका वाहिनीवरील मुलाखतीत निकम यांनी पुन्हा एकदा माहिती दिली. त्यांनी म्हटलं, " कसाबनं मटण बिर्याणीची मागणी केली का? असे मी म्हटलं होतं. त्यावरून अक्कलेचे तारे तोडण्यात आले होते. विरोधी पक्षांनीही बिर्याणी देण्याच्या विधानावरून टीका केली होती."