मुंबईDanve Demand To Election Commissioner :राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक 2024 चं कामकाज सुरू झालं आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे. असं असताना 'प्रभारी पंतप्रधान' नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामं करण्यात येत आहेत. स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे.
आचारसंहिता भंग :निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र राजकीय पक्षांकडून त्यांचे पालन करून नेत्यांच्या सभा सुरू असून चौथ्या टप्प्यातील प्रचाराची कामे सुरू आहेत; परंतु पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी या आचारसंहितेचा भंग करून ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामं करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी येणार असल्याने विमानतळापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छतेची कामं कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली.