पारंपरिक संगीतानं उत्साहात सुरू झाला वेरुळ अजिंठा महोत्सव छत्रपती संभाजीनगर Ajanta Ellora Festival 2024 : बहुचर्चित वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला शुक्रवारी 2 फेब्रुवारीला सायंकाळी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पर्यटन दूत नवेली देशमुख हिच्या गणेश वंदनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनतर डॉ. संध्या पूरेचा आणि त्यांच्या टीमनं आपल्या नृत्यातून भक्ती आणि शक्तीचं प्रदर्शन केलं. पंडिता अनुराधा पाल यांच्या स्त्री शक्ती इन्स्ट्रुमेंटस् फ्युजन या टीमनं स्त्री शक्तीवर आधारित एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात पाच वेगवेगळ्या वाद्यांवर स्त्री शक्तीचं चित्रण करणारे संगीत सादर करण्यात आलं. तर सर्वात शेवटी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या सुरेल आवाजानं पहिल्या दिवसाची सांगता केली.
पर्यटनाला चालना देण्यासाठी करणार प्रयत्न :"काही कारणामुळं महोत्सव बंद पडला होता. मात्र, सर्व यंत्रणांच्या समन्वयानं हा महोत्सव मागील वर्षापासून पुन्हा नव्या जोमानं सुरू झाला. आता हा महोत्सव कधीही खंडित होणार नाही. इतकंच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरचं वैभव या महोत्सवाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचेल," असा विश्वास पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला. "आम्ही सगळे मिळून शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. या महोत्सवाच्या निरंतर प्रक्रियेसाठी निधी कमी पडू देणार नाही. पैठण येथील बंद पडलेल्या उद्यानाचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. पर्यटन वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाईल," असं देखील पालकमंत्री भुमरे यांनी सांगितलं.
या मान्यवरांची होती प्रमुख उपस्थिती :या महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांचं स्वागत पुस्तक देऊन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख, लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक मनिश कलवानिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, महोत्सवाचे समन्वयक अनिल इरावने, सारंग टाकळकर, माजी पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांची प्रमुख उपस्थिती होती.
भरतनाट्यातून अनुभवला भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम :डॉ. संध्या पूरेचा आणि त्यांच्या टीमनं आपल्या नृत्यातून भक्ती आणि शक्तीचं प्रदर्शन केलं. त्यात प्रामुख्यानं पहिल्या नृत्यात उमा महेश्वर स्त्रोताच्या माध्यमातून भगवान शिव आणि शक्तीच्या माध्यमातून दुर्गा, काली आणि भवानीचं रूप सादर केलं. दुसऱ्या नृत्यातून अभंगाच्या माध्यमातून अबीर गुलाल. या रचनेवर संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे अध्यात्मातील महत्त्व अधोरेखित केलं. तिसऱ्या नृत्यातून देवी अर्गला स्त्रोत्राद्वारे वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय दाखवून दिला. डॉ. संध्या पुरेचा यांनी सादर केलेल्या भरतनाट्यातून प्रेक्षकांनी लय, मुद्रा, भाव आणि अभिनय यांचा उत्कृष्ट मिलाफ अनुभवला. त्यांच्या अभिनयातून त्या पात्रेतील भावना प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचला. त्यांच्या नृत्यदिग्दर्शनात नवीन कल्पनांची अनुभूति घेतली. त्यांच्या नृत्यातील वेशभूषा नेहमीच सुंदर आणि मनमोहक प्रेक्षकांनी डोळ्यात साठवून ठेवली. पंडिता अनुराधा पाल यांच्या स्त्री शक्ती इन्स्ट्रुमेंटस् फ्युजन या टीमनं स्त्री शक्तीवर आधारित एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात पाच वेगवेगळ्या वाद्यांवर स्त्री शक्तीचं चित्रण करणारे संगीत सादर केलं गेलं. हा कार्यक्रम स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. स्त्री शक्तीच्या विविध पैलूंवर आधारित रचना सादर करून वादकांनी स्त्री शक्तीचा उत्सव साजरा केला. वादकांच्या कौशल्याची आणि स्त्री शक्तीच्या चित्रणाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली. तबला आणि पख्वाद पंडिता अनुराधा पाल, कर्नाटकी व्हायोलिन श्रुती सारथी, अनुजा बोराडे पखवाज आणि ढोलकी छत्रपती संभाजीनगरची वैष्णवी गीते यांनी वादन केलं. तर सर्वात शेवटी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनानं सांगता झाली. उपस्थित श्रोत्यांनी भरभरून कलेचं कौतुक केलं.
हेही वाचा :
- Tribal Dance In Melghat: मेळघाटातील हिरव्यागार जंगलामध्ये आदिवासींनी धरला ठेका, पहा त्यांच्या नृत्याविष्काराचे खास रंग
- K Kavita Akka Dance: 'बतकम्मा उत्सवात' आमदार के कविता अक्कांचं पारंपरिक नृत्य...पाहा व्हिडिओ