महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिल्लीतील 'अब्दाली'नं..."; संजय राऊतांचा प्रहार - Sanjay Raut MNS Supari

Sanjay Raut MNS Supari : उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर ठाण्यात मनसैनिकांनी हल्ला केला. ठाकरेंच्या गाडीवर नारळ, शेण, बांगड्या फेकण्यात आल्या. यावरुन आता राजकारण तापलं आहे. शिवसेना - UBT चे खासदार संजय राऊत यांनी या विषयावरुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut
ठाण्यातील राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 12:13 PM IST

Updated : Aug 11, 2024, 12:40 PM IST

मुंबई Sanjay Raut MNS Supari : उद्धव ठाकरे यांची शनिवारी ठाण्यात सभा होती. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. यावर आता खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. "उद्धव ठाकरेंच्या सभेत जे झालं ते दिल्लीतील 'अब्दाली'ची लोकं होती. अब्दालीनं महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिल्या, त्यातील ती एक सुपारी होती. काळोखाचा फायदा घेऊन हे कृत्य केलं म्हणून तुम्ही वाचलात, मात्र तुम्ही मर्दांची अxxx असता तर समोर येऊन कृत्य केलं असतं," अशा शब्दात संजय राऊतांनी मनसे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

राजकारण तापलं :ठाण्यामध्ये शनिवारी मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची 'भगवा सप्ताह सभा' उधळण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर टोमॅटो, बांगड्या, नारळ आणि शेण फेकण्यात आलं. त्यानंतर मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जुंपली. आजही त्याचे पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी सुपाऱ्या : "भगवा सप्ताहनिमित्त ठाण्यामध्ये शनिवारी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत झालं. ठाकरेंनी तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. ज्या पद्धतीनं भगवा सप्ताह संपन्न व्हायला हवा होता त्या पद्धतीनं तो साजरा झाला. परंतु ठाण्यात जे झालं ती दिल्लीतील अब्दालीची लोकं होती. अब्दालीनं महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपार्‍या दिल्या, त्यातील ती एक सुपारी होती," अशा शब्दात संजय राऊतांनी मनसेचा समाचार घेतला.

शिवसेनेचा संबंध नाही : "बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर कुणीतरी काहीतरी फेकलं. त्याच्याशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. स्थानिक पातळीवर मराठा आंदोलक एकत्र आले असतील आणि तसा प्रकार घडला असेल. पण त्याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. मात्र, कोणी सांगत आहे की ठाण्यातील प्रकार हा ॲक्शनला रिएक्शन आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन हे कृत्य केलात म्हणून तुम्ही वाचलात. तुम्ही मर्दांची अxxx असता तर समोर येऊन हे कृत्य केलं असतं," असा दम राऊतांनी भरला.

दिल्लीत बसून अब्दाली टाळ्या वाजवतो :संजय राऊत पुढे म्हणाले, "माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की, पुन्हा असले प्रकार काळोखात लपून छपून करू नका. तुमच्या घरात कुणीतरी तुमची वाट पाहत असेल. जर तुम्ही कृत्य करत असाल तर 'अहमद शहा अब्दाली' दिल्लीत बसून मजा बघत आहे. महाराष्ट्रात असं आपापसामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी अब्दालीनं महाराष्ट्रातील प्रमुख दोन ते तीन नेत्यांना सुपारी दिली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयेसुद्धा देण्यात आले आहेत. मराठी माणसात आपापसात भांडण लावून अब्दाली दिल्लीत टाळ्या वाजवत आहे. हे या लोकांना समजलं पाहिजे."

अब्दालीची सुपारी घेतलेली लोक : "ठाण्यातील वातावरण बदलत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं आमची पाऊलं पडत आहेत, त्याला दृष्ट लावण्यासाठी अहमद शहा अब्दालीची सुपारी घेतलेली लोक अशी कृत्य करत आहेत. मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही. हे फक्त व फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शहा अब्दाली याच्या सांगण्यावरून होत आहे. देवेंद्र फडणवीस, राज्याचे मिंदे मुख्यमंत्री या सर्वांना माहिती आहे. थोडे दिवस थांबा, तुम्हाला ॲक्शनला रिएक्शन काय असतं ते समजेल," अशा शब्दात राऊतांनी सरकारला इशारा दिलाय.

हे सरकारच भ्रष्ट आहे : हिंडनबर्गच्या अहवालात सेबी प्रमुखांवर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "एकीकडं अदानी कंपनीची चौकशी सुरू असताना दुसरीकडं अदानी यांच्या कंपनीत सेबी प्रमुखांचीसुद्धा गुंतवणूक आहे. या देशातील वित्तीय संस्थांमध्ये जे काही चुकीचं काम होत आहे, त्यावर नजर ठेवण्याचं ज्यांचं काम आहे, ती यंत्रणा कशा भ्रष्ट पद्धतीनं काम करत आहे हे समोर येऊनसुद्धा जर का सरकार शांत राहत असेल, तर हे सर्वात भ्रष्ट सरकार आहे. सेबीचे प्रमुखच पंतप्रधानांच्या लाडक्या व्यक्तीशी हात मिळवणी करतात, त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करतात. मग अशा व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करणार?."

हेही वाचा

  1. "घरात घुसून मारल्याशिवाय..."; मनसेचा ठाकरे गटाला इशारा, जितेंद्र आव्हाड म्हणाले... - Uddhav Thackeray Convoy Attacked
  2. उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांचा राडा; गाडीवर फेकल्या बांगड्या आणि शेण - Thackeray Group VS MNS
Last Updated : Aug 11, 2024, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details