महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैशासाठी जीवाशी खेळ! जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकून जप्त केली ५० लाखांची भेसळयुक्त दूध पावडर - Milk powder seized in Ashti - MILK POWDER SEIZED IN ASHTI

Milk powder seized in Ashti :बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा टाकला. यावेळी त्यांनी एक हजार क्विंटल भेसळयुक्त दूध पावडर जप्त केली.

adulterated milk powder seized
भेसळयुक्त दूध पावडर साठा (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 5:31 PM IST

Updated : Aug 4, 2024, 5:59 PM IST

बीड - दूध भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे राज्य सरकारचे आदेश असूनही भेसळखोरांचे कारनामे सुरू आहेत. बीडच्या आष्टीत 50 लाखांची भेसळयुक्त दूध पावडर जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. बीडचे जिल्ह्याधिकारी अविनाश पाठक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध मिळत असल्याच्या भीतीनं नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन आष्टी तालुक्यात होते. मात्र, याच तालुक्याच्या दुग्धोत्पादनाला भेसळीचे ग्रहण लागले आहे. कारण, यापूर्वीदेखील बीडच्या आष्टी तालुक्यात काही दूध संघावरदेखील कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीदेखील दूध तयार करण्याची भेसळयुक्त पावडर मोठ्या प्रमाणात सापडली होती. हाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया या ठिकाणी दूध तयार करण्याची भेसळयुक्त पावडर सापडली.

गोपनीय माहितीच्या अधिकारी कारवाई-आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत दुकान आहे. तसेच लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला.

भेसळयुक्त पावडरची किंमत 50 ते 60 लाख रुपये-टाकळी अमिया या ठिकाणी अंबादास चौधरी याच्या गोडावूनमध्ये हजारो क्विंटल भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर असल्याचे जिल्हाधिकारी पाठक यांना समजले. त्यांनी रात्री दोन अडीच वाजता अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या सोबत या ठिकाणी छापा घातला. सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी अविनाश पाठक घटनास्थळी हजर होते. या ठिकाणी आतापर्यंत जप्त केलेल्या भेसळयुक्त पावडरची किंमत 50 ते 60 लाखांच्या आसपास आहे. प्रशासनाला गोडाऊनमध्ये एकूण 600 गोण्या सापडल्या आहेत.

या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत घेतला सहभाग-कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे, अनुराधा भोसले, सहाय्यक आयुक्त कांबळे, आष्टीचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबत कारवाईत पोलीस हवालदार बबुशा काळे, पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव अंमलदार मजरूद्दीन सय्यद, सचिन गायकवाड, दिपक भोजे, सचिन पवळ, महिला अंमलदार जिजाबाई आरेकर आणि अर्चना आरडे यांनी सहभाग घेतला.

  • बीड जिल्ह्यासह अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रमधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचं यापूर्वी उघडकीस आले. मात्र, यावर किरकोळ कारवाई होते. परंतु कठोर शिक्षा होत नाही, असा ग्राहकांकडून आरोप होत आहे.
Last Updated : Aug 4, 2024, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details