मुंबई Laila Khan Murder Case : 2011 मध्ये आरोपी असलेल्या सावत्र बाप परवेज टाक (Accused Parvez Tak) याने लैला खान (Laila Khan), तिची आई सेलिना, जुळी भावंडं झारा आणि इम्रान, मोठी बहीण हाश्मीना आणि अफ्रिन पटेल यांची इगतपुरीच्या फार्महाउसवर नेऊन निर्घृण हत्या केली होती. पोलिसांपासून सुटका व्हावी म्हणून परवेजने फार्महाउसवर स्विमिंग पूलसाठीच्या खड्ड्यात मातीचा भर टाकून आणि गाद्यांखाली हे सहा मृतदेहा गाडले होते.
सहा मानवी सांगाडे बाहेर काढले: याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा ४ जुलै २०१२ रोजी दाखल झाला आणि हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ८ कडं वर्ग करण्यात आला. कक्ष ८ कडं तपास आला आणि तपासाची चक्रे जोरदार फिरली. कक्ष ८ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु झाला आणि अवघ्या चार दिवसात म्हणजेच ८ जुलै २०१२ ला आरोपी परवेज टाक याला जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथून बेड्या ठोकत मुंबईत आणले. परवेजला बोलतं करून इगतपुरी येथील फार्महाउसपर्यंत कक्ष ८ चे पथक पोहोचले. कक्ष ८ च्या पोलिसांनी परवेजने दाखवलेल्या ठिकाणी उत्तखनन करून सहा मानवी सांगाडे बाहेर काढले होते. या सांगाडयांचा डीएनए केवळ सेलिना यांच्याशी जुळला.
डीएनए आईशी जुळले :सेलिनाचा पहिला पती नासिर पटेल, दुसरा असिफ शेख आणि तिसरा परवेज इकबाल टाक यांच्याशी एकाही आपत्याचा डीएनए जुळलेला नाही ही तपासातील विशेष बाब आहे. सेलिनाचा पहिला पती नासिर पटेल हा सध्या हयात नसून दुसरा पती असिफ शेख हा पुण्यात राहतो. डीएनए आईशी जुळले असून पोलिसांना सापडलेल्या सांगाड्यांवर सोन्याचे दागिने आणि इतर गोष्टींमुळं देखील त्यांची ओळख पटली असल्याचं एका तपासातील पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे भक्कम पुरावे म्हणून सहा मानवी सांगडे अजूनपर्यंत तब्ब्ल १३ वर्ष पोलिसांनी जतन करून ठेवले आहेत.
मुंबई ते जम्मू काश्मीर अशी झाली गुन्ह्याची उकल : कक्ष ८ कडे तपास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये लैला खानची आई सेलिना हिची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली होती. कारण परवेज टाक आणि त्याचा साथीदार शकील वाणी हे पळून जम्मू काश्मीरमध्ये एका हॉटेलात राहण्यासाठी गेले होते. परवेज हा इस्टेट एजंटचे काम करत होता. त्याच्यावर जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड पोलिसात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. हॉटेलमधील लोकांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं आणि पोलिसांनी जम्मू काश्मीरमधील फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. दरम्यान हॉटेलबाहेरील स्कॉर्पिओ कार देखील जप्त केली. त्याची माहिती काढली असता ती सेलिना यांच्यावर मुंबईतील असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचप्रमाणं लैला खान आणि तिच्या कुटुंबियांसोबत शेवटपर्यंत परवेज टाकला पाहणारे साक्षीदार देखील पोलिसांच्या हाती लागले आणि या गुन्ह्याचे कोडे सुटले. तसेच पोलिसांना परवेज टाक याचे मतदानाचे कार्ड देखील स्कॉर्पिओ कारमध्ये सापडले होते. या गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भूमिका कक्ष ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे, पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम आणि पोलीस हवाल असलेल्या अंकुश साळवी यांनी बजावली होती. अंदाजे १७ हजार ४० पानांचे आरोपपत्र या गुन्ह्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती, दीपक फटांगरे यांनी दिलीय. तसेच त्यांनी सांगितलं की, या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता. पण गुन्हा दुर्मिळ असल्याचा कसब लावून तपास केला.