अमरावतीProperties Of Udumbara Tree:अनेक मंदिरांमध्ये तसंच धार्मिक स्थळांवर उंबराचं झाड हे हमखास बहरलेलं दिसतं. उंबराचं झाड तोडू नये असं सांगितलं जातं. उंबराच्या झाडाला हिरवी लाल फळं नेहमीच आढळतात. उंबराची फळं दिसत असली तरी उंबराचं फूल हे कोणीही पाहिलं नाही. खरंतर उंबराचे फळ हेच उंबराचे फूल आहे. उंबराचं फूल फोडल्यावर त्यामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. या फळांमध्ये 'ब्लास्टोफ्यागा पेनिस' हा कीटक नेहमीच आढळतो. चिलटासारख्या असणाऱ्या ह्या कीटकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बॅक्टेरिया आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. यातील मुख्य मादी अंडी घालून अनेक नर मादी पिल्लांना जन्म देते. ही मादी स्वतः तिच्या पिल्लांना बंद फळाबाहेर काढत आपली आहुती देते. मादी मृत्यूला कवटाळून या फळांमध्येच विलीन होते. या फळात पौष्टिकता निर्माण करते. उंबराप्रमाणेच वड, पिंपळ आणि अंजीर या फळांची रचना देखील बाहेरून फळ आणि आतून फुले अशीच आहे. यातील नर जातीची फुलं ही फळांच्या पुढच्या भागात असतात तर स्त्री जातीची फूलं ही देठाकडील भागात असतात उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते. झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी मान्यताच नव्हे तर ते नैसर्गिक सत्य असल्याचे वैभव मस्के यांनी सांगितलं.
घराच्या उंबरठ्याचा उंबराशी संबंध :घराचा उंबरठा असा शब्द नियमित वापरला जातो. पूर्वीच्या काळी उंबराच्या झाडाच्या लाकडापासून घराला लावल्या जाणारा दाराच्या चौकटीखाली खास उंबरठा तयार केला जायचा. आज देखील अनेक जुन्या वाड्यांमध्ये सागवानाची मोठी दारं असली तरी उंबरठा हा उंबराच्या लाकडाचाच आढळतो. पाण्यातही दीर्घकाळ हे लाकूड टिकून राहात असल्यामुळे त्याचा वापर दाराच्या उंबरठ्यासाठी केला जात असे. दाराच्या खाली उंबराचे लाकूड म्हणून त्या भागाला उंबरठा असं नाव पडलं. आज ज्याला आपण उंबरठा म्हणतो त्या ठिकाणी उंबराच्या लाकडाचा वापर होत नसला तरी त्या जागेचं नाव मात्र उंबरठा म्हणूनच घेतला जात असल्याचं वैभव मस्के यांनी सांगितलं.
उंबराबाबत अशी आहे आख्यायिका :सद्गुरु दत्त यांचं उंबराच्या झाडाखाली स्थान असल्याची श्रद्धा आहे. महादेवाच्या मंदिर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उंबराची झाडं आढळतात. भगवान विष्णूने नृसिंहवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावर बसून केला. त्यावेळी नृसिंहाला जखमा होऊन त्याच्या नखात विषबाधा झाली. त्यामुळे नृसिहांनी आपली नखं उंबराच्या खोडात खूपसून विषबाधेचं शमन केलं. लक्ष्मीने उंबराची फळ वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावला आणि त्यामुळे नृसिंहांना होणारा दाह थांबला अशी आख्यायिका देखील उंबरा संदर्भात पुराणांमध्ये असल्याचं प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.