नाशिकNashik Accident News : नाशिकरोड परिसरात आज सिटी बसच्या धडकेत एका पाच वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडलीय. नाशिकरोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपोमध्ये हा अपघात झाला. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई (वय 5 वर्ष) तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात होती. यावेळी सिटीलींक बस चालकानं भरधाव वेगानं तिला मागून धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचं चाक गेल्यानं तिचा जागेवर मृत्यू झालाय. तर तिच्या आजोबांचा जीव थोडक्यात बचावला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील दोन दिवसात नाशिक शहरात तीन वाहन अपघाताच्या घटनामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
बस चालक दारूच्या नशेत :बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं. सदर घटना परिसरात कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यावेळी काही तरुणांनी बसची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस वेळेवर पोहोचल्यानंतर अनर्थ टळला. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला. या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.