मुंबई Tuberculosis Patient:मुंबईकर सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहेत. कुठे खोदून ठेवलेले रस्ते, तर कुठे कधी नव्हे ते भेडसावणारी पाणी टंचाई, ट्राफिक, प्रदूषण अशा सर्वच समस्यांना मुंबईकर पुरून उरत आहेत. त्याला 'मुंबई स्पिरिट' असं गोंडस नाव देण्यात आलय. या सगळ्याचा परिणाम मात्र, मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे पालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी. बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागानं क्षयरोगाबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलीय. या आकडेवारीनुसार, पालिकेच्या आरोग्य विभागाला वर्षभरात 4 हजार 66 किशोरवयीन टीबी रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं सध्या मुंबईकरांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अशी आहे आकडेवारी : पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, 0 ते 15 वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये 2021 ते 2023 या तीन वर्षात 12893 रुग्ण आढळले. 2021 मध्ये 4569 किशोरवयीन टीबी बाधित (TB) रुग्णांची नोंद करण्यात आलीय. 2022 मध्ये 4,285 मुलांना क्षयरोग झाल्याचं समोर आलंय. हीच संख्या 2023 मध्ये 466 इतकी झाली. 2023 मध्ये एकूण एक लाख 52 हजार आठ रुग्णांची तपासणी करण्यात आलीय. यात पुरुष आणि स्त्री क्षयरोग बाधित रुग्णांचं प्रमाण साधारणतः सारखंच आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेली 2022 मधील आकडेवारी पाहता मुंबईत क्षयरोगाचे 55 हजार 284 रुग्ण आढळले होते. तर, वर्ष 2023 मध्ये या रुग्णांची संख्या 50 हजार 206 इतकी आढळली.
'या' आजाराची लक्षणं काय?: या संदर्भात बोलताना पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं की, क्षयरोग बाधित रुग्णांमध्ये दोन आठवड्यांपासून अधिक कालावधीचा खोकला असतो. दोन आठवड्यांहून अधिक कालावधी रुग्णाला ताप असतो. रुग्णाचं वजन कमी होतं. भूक मंदावते. रात्री घाम येतो आणि मानेवर गाठ येते. अशी लक्षणं असतील तर संबंधित व्यक्तीनं तातडीनं नजिकच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि वेळेत उपचार घ्यावेत.