नागपूरGold Smuggling Case Nagpur: नागपूरच्या विमानतळावर दोन प्रवाश्यांना सोने तस्करीच्या प्रकरणात आज अटक करण्यात आलेली आहे. जे एअर अरेबिया फ्लाइट क्र. G9-415 ने शारजावरून नागपूरला येत असलेल्या दोघांनी सोन्याच्या बिस्किटांसह अनेक महागडे मोबाईल लपवून आणले आहेत. या गोपनीय माहितीच्या आधारे दोघांची झडती घेण्यात आली. त्यावेळी दोघांकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोन्याचे दोन गोल्ड बिस्कीट आणि मोबाईल आढळून आले आहे. मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव असे या तस्करांचे नावं असून ते दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत. कारवाई नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटने केली आहे.
'या' कारणाने सुरक्षा यंत्रणांना आला संशय :जे एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9-415 ने शारजावरून नागपूर निघालेल्या विमानात दोन प्रवाशांची वागणूक ही संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटला समजल्यानंतर नागपूर विमानतळावर शारजावरून आलेल्या दोघांवर पाळत ठेवण्यात आली. दोघांच्या हालचालीवर पथकाला संशय आला असता त्याची चौकशी केली गेली. यावेळी त्यांच्याजवळ २०० ग्राम सोन्याचे बिस्कीट आणि काही आयफोनसह विदेशी मूळच्या सिगारेट पाकीट जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार, सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कारवाई करण्यात आली.