मुंबई Mumbai Police Transfer : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र शहरातील कायदा आणि सुव्यवस्था संभाळण्यास पोलीस दल सक्षम असल्याचा दावा सरकारच्या वतीन करण्यात येत आहे. त्यातच आता मायानगरी मुंबईतील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. त्यातच सोमवारी त्यांनी मुंबई पोलीस दलातील तब्बल 18 पोलीस उपायुक्तांचा खांदेपालट केला आहे. शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या दोन उपायुक्तांच्या बदल्यांचाही यात समावेश आहे.
दत्ता नलावडे यांची गुन्हे शाखेत बदली :मुंबई पोलीस दलातील परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची ऑपरेशन विभागात बदली करण्यात आली आहे. अकबर पठाण यांच्या जागी झोन 9 चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांना झोन 3 मध्ये पाठवण्यात आलं आहे. तर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांना परिमंडळ 10 मधून गुन्हे शाखेच्या डिटेक्शन 2 ची जबाबदारी देण्यात आली आहे.
तेजस्वी सातपुते यांच्याकडं परिमंडळ 5 ची जबाबदारी :मुख्यालयातील 2 विभागाच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांना मनोज पाटील यांच्या जागी परिमंडळ 5 मध्ये पाठवण्यात आलं आहे. तर विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांना दत्ता नलावडे यांच्या जागी परिमंडळ 10 मध्ये पाठवण्यात आलं आहे.