हरारे ZIM vs AFG 3rd ODI Live Streaming :झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 21 डिसेंबर (शनिवार) रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथं खेळवला जाईल.
यजमानांचा संघर्ष : या मालिकेत झिम्बाब्वे क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध संघर्ष करत आहे. पहिला वनडे सामना रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला तब्बल 232 धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात फक्त न्यूमन न्याम्हुरी आणि ट्रेव्हर वेस्ली ग्वांडू यांनी गोलंदाजीत थोडा संघर्ष दाखवला, पण फलंदाजी क्रम अफगाण गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही.
दुसऱ्या सामन्यात काय झालं : दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्ताननं झिम्बाब्वेचा एकतर्फी पराभव केला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ अवघ्या 54 धावांत गडगडला, त्यामुळं अफगाणिस्ताननं सामना सहज जिंकला. झिम्बाब्वेच्या फलंदाजांच्या या मोठ्या अपयशाचं श्रेय अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना जातं. फजलहक फारुकी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन बळी घेतले. फारुकीची अचूक लाईन आणि लेन्थ आणि ओमरझाईच्या वेगानं झिम्बाब्वेच्या फलंदाजांची चांगलीच कोंडी केली.
अफगाण संघाची नजर मालिका विजयावर : आता अफगाणिस्तानची नजर शेवटची वनडे जिंकून मालिका जिंकण्याच्या दिशेनं आहे. दुसरीकडे, हा सामना झिम्बाब्वे संघासाठी आपली प्रतिष्ठा वाचवून चांगली कामगिरी करण्याची शेवटची संधी आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर मजबूत उभं राहण्यासाठी संघाला आपल्या फलंदाजीच्या क्रमात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
दोन्ही संघांची हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यापैकी झिम्बाब्वेनं 10 सामने जिंकले आहेत, तर अफगाणिस्ताननं 19 वेळा विजय मिळवला आहे. खराब हवामानामुळं एक सामना रद्द झाला. वनडे प्रकारात अफगाणिस्तानचं झिम्बाब्वेवर बरंच वर्चस्व असल्याचं या विक्रमावरुन दिसून येतं. दोन्ही संघांमधील हा सामना नेहमीच रोमांचक असतो, विशेषतः जेव्हा झिम्बाब्वे घरच्या मैदानावर खेळत असतो. आगामी मालिकेत दोन्ही संघांना आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.
खेळपट्टी कशी असेल : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा वनडे सामना हरारे इथं खेळवला जाणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. गेल्या 10 वनडे सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 188 धावांची आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळेल, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू प्रभावी ठरतील. या खेळपट्टीवर 250 धावा सामना जिंकण्यासाठी पुरेशा असू शकतात. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीच्या विकेटचा फायदा मिळू शकतो.
हवामान कसं असेल :झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान हरारेमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असेल. परंतु, पावसाची शक्यता नाही. तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल, ज्यामुळं संपूर्ण सामना खेळता येईल.