हरारे ZIM vs AFG 2nd ODI Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 19 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे.
पहिला वनडे पावसात : पावसामुळं मालिकेतील पहिला वनडे सामना अनिर्णित राहिला. पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेनं 9.2 षटकांत 5 गडी गमावून 44 धावा केल्या. मात्र यानंतर पावसानं सामना विस्कळीत केल्यानं पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा आता दुसऱ्या वनडेवर असतील. यजमान झिम्बाब्वे संघानं शेवटच्या वेळी 6 मार्च 2018 रोजी अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव केला होता. यानंतर त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध वनडेत विजय मिळवता आलेला नाही. अशा परिस्थितीत यजमान संघ हा सामना जिंकत पराभवाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न करेल.
घरच्या मैदानावर विजयाची प्रतिक्षा : झिम्बाब्वे क्रिकेट संघानं गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतील एका सामन्यात आश्चर्यकारक विजय नोंदवला, परंतु उर्वरित दोन सामने गमावले आणि मालिका 1-2 नं गमावली. याआधी वर्षाच्या सुरुवातीलाही त्यांना श्रीलंकेविरुद्ध 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता क्रेग एर्विनच्या नेतृत्वाखालील संघानं घरच्या परिस्थितीचा फायदा उठवत अफगाणिस्तानला पराभूत करणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरुन आगामी सामन्यांपूर्वी विजयाची मालिका साधता येईल. विशेष म्हणजे झिम्बाब्वेनं आतापर्यंत एकदाही अफगाणिस्तानला पराभूत केलेलं नाही. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत सहा वनडे मालिका झाल्या आहेत, यात एक मालिका बरोबरीत झाली तर अफगाणिस्ताननं 5 मालिका जिंकल्या आहेत.
दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा : या वनडे मालिकेतील झिम्बाब्वेचे कर्णधारपद क्रेग एर्विनच्या खांद्यावर आहे. तर ब्रायन बेनेट, तदिवनाशे मारुमणी, डिऑन मायर्स, सीन विल्यम्स, सिकंदर रझा आणि आशीर्वाद मुझाराबानी यांच्यासह अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानची कमान सांभाळेल. तर रहमानउल्ला गुरबाज, रहमत शाह, लब्दीन नायब, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान यांच्यासह अनेक नवीन खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघांमध्ये आतापर्यंत एकूण 28 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसतो. अफगाणिस्ताननं 18 वनडे सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं केवळ 10 सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत आहे. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झिम्बाब्वेला मिळू शकतो.
खेळपट्टी कशी असेल : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना हरारे इथं खेळवला जाणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. गेल्या 10 वनडे सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 188 धावांची आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळेल, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू प्रभावी ठरतील. या खेळपट्टीवर 250 धावा हा सामना जिंकण्यासाठी पुरेसा असू शकतात. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीच्या विकेटचा फायदा मिळू शकतो.
हवामान कसं असेल : दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान हरारेमध्ये हलके ढग असतील, परंतु पाऊस अपेक्षित नाही. तापमान सुमारे 27 डिग्री सेल्सियस असेल, ज्यामुळं संपूर्ण सामना खेळता येईल.